वृद्धेच्या हत्येतील आरोपीचा छडा नाही
By Admin | Updated: October 9, 2015 03:09 IST2015-10-09T03:09:31+5:302015-10-09T03:09:31+5:30
तात्या टोपेनगरातील वृद्धेच्या हत्येच्या घटनेला ३६ तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही आरोपीचा छडा लागला नाही.

वृद्धेच्या हत्येतील आरोपीचा छडा नाही
धागेदोरे घराभोवतालीच असल्याची पोलिसांना शंका
नागपूर : तात्या टोपेनगरातील वृद्धेच्या हत्येच्या घटनेला ३६ तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही आरोपीचा छडा लागला नाही. दरम्यान, या हत्याकांडाचे धागेदोरे मृत महिलेच्या ‘घरासभोवतालच’ असल्याचा अंदाज आतापर्यंतच्या तपासातून पोलिसांनी बांधला असून, येत्या काही तासातच आरोपीचा छडा लावण्यात यश मिळेल, असा विश्वास पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत.
वसुंधरा ऊर्फ जयश्री आनंद बाळ (६७) असे मृत महिलेचे नाव आहे. नीरीचे निवृत्त दिवंगत वैज्ञानिक आनंद बाळ यांच्या त्या पत्नी होत. मुलगा आदित्य, सून नीलिमा आणि आद्या नामक नातीसह वसुंधरा तात्या टोपेनगरात राहत होत्या. बुधवारी सकाळी मुलगा आणि सून कर्तव्यावर निघून गेले.
सकाळी १०.१५ वाजता मोलकरीण शिला इंगळे ही घरात आली.
त्यानंतर वसुंधरा यांच्या हत्येची घटना उघड झाली. प्रतापनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले. तेव्हापासून आरोपीची शोधाशोध सुरू आहे.
वृद्ध महिलेच्या हत्येचे हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर गंभीरपणे घेण्यात आले आहे. त्यामुळे हत्याकांडाचा उलगडा करून आरोपीचा छडा लावण्यासाठी प्रतापनगरसह गुन्हेशाखेचे पथकही कामी लागले आहेत. (प्रतिनिधी)
गळा दाबून हत्या
दरम्यान, वसुंधरा यांची हत्या गळा दाबून (आवळून नव्हे) करण्यात आल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे वसुंधरा यांची हत्या एकापेक्षा जास्त व्यक्तीने केली असावी, असा संशय आहे. पोलिसांना या हत्येत एक संशयास्पद दुवा एका पुरुषाच्या रूपाने मिळाला आहे. त्यामुळे गुरुवारी शिला, मोहम्मद आनिशसह १४ ते १५ लोकांची पोलिसांनी जबानी घेतली. एकूणच स्थितीवरून आरोपीने योजनाबद्धरीत्या (कटकारस्थान करून) ही हत्या केली असावी, असा तर्क पुढे आला आहे. या प्रकरणातील आरोपींना आम्ही लवकरच शोधून काढू, असा विश्वास प्रतापनगरचे ठाणेदार रवींद्र गिद्दे यांनी व्यक्त केला आहे.