बिबट्या आयटी पार्क परिसरातच, पहाटे दिसला सीसीटीव्हीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:21+5:302021-05-30T04:07:21+5:30
नागपूर : शुक्रवारी येथील आयटी पार्क परिसराजवळील गायत्रीनगरात दिसलेल्या बिबट्याचा मुक्काम आयटी परिसरातच असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी ...

बिबट्या आयटी पार्क परिसरातच, पहाटे दिसला सीसीटीव्हीत
नागपूर : शुक्रवारी येथील आयटी पार्क परिसराजवळील गायत्रीनगरात दिसलेल्या बिबट्याचा मुक्काम आयटी परिसरातच असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी रात्री पाऊणेतीन वाजेच्या सुमारास एका सॉफ्टवेअर कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये तो दिसला. त्यामुळे त्याच्या याच परिसरातील अस्तित्वाची शक्यता व्यक्त होत आहे.
शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बिबट्या गायत्रीनगरातील दोन व्यक्तींना दिसला होता. त्यानंतर घराच्या छतावरही त्याच्या पावलांचे ठसे आढळले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वन विभागाने शोध घेतला. सहा कॅमेरे ट्रॅप लावले. शनिवारी या कॅमेऱ्यांची तपासणी केली असता एकाही कॅमेऱ्यामध्ये त्याची छायाचित्रे आढळली नाहीत. त्यामुळे पुन्हा कॅमेरे वाढविण्याचे किंवा कॅमेऱ्यांची जागा बदलण्याचे नियोजन सुरू आहे.
दरम्यान, व्हीएनआयटी कॉलेज परिसरातील कंपन्यांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आणि खाजगी कॅमेऱ्यांची तपासणी शनिवारी सकाळी करण्यात आली. त्यात कॉलेजच्या जवळ असलेल्या एका सॉफ्टवेअर कंपनीच्या कॅमेऱ्यामध्ये हा बिबट्या दिसला. पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास छतावरून उडी मारून तो पलीकडे जात असल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे. एवढीच एकमेव माहिती त्याच्या अस्तित्वाचा पुरावा देण्यासाठी पुरेशी ठरली आहे.
वन विभागाच्या शोध पथकाने शुक्रवारी रात्री १.३० वाजेपर्यंत शोध घेतला. त्यानंतर दुसऱ्या पथकाने सकाळी ७ वाजेपर्यंत पाहणी केली. मात्र, माहिती मिळाली नाही. या परिसरात अंबाझरीकडून आलेला सुमारे ७०० ते ८०० मीटर लांबीचा नाला आहे. त्यावाटे तो आला असावा, अशी शक्यता आहे. परिसरात बेवारस कुत्र्यांची, तसेच डुकरांची संख्या अधिक आहे. दडून बसण्यासाठी झाडीही आहे. त्यामुळे तो या परिसरात स्थिरावला असावा, असा अंदाज आहे.
...
तीन रेंजच्या पथकाची गस्त
बिबट्याच्या शोधासाठी तीन रेंजच्या पथकातील सुमारे २५ कर्मचाऱ्यांची गस्त सुरू आहे. सेमिनरी हिल्स रेंज, हिंगणा रेंज आणि ट्रॅन्झिट ट्रीटमेंट सेंटरचा चमू असा यात समावेश आहे. बिबट दिसलाच तर रेस्क्यू करून त्याला पकडण्याचेही नियोजन आहे. मात्र, त्याचा नेमका ठावठिकाणा लागला नसल्याने शोध घेणेच सुरू आहे.
...
बिबट्या ५ वर्षांचा
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली माहिती, पावलांचे ठसे आणि सीसीटीव्हीमधील छायाचित्र यावरून हा बिबट्या अंदाजे साडेतीन फूट उंच व चार ते साडेचार फूट लांबीचा असावा असा अंदाज आहे. पावलांच्या ठशावरून त्याचे वय ५ वर्षे असावे, असे सांगण्यात येत आहे.
...
कोट
हा मानवी वस्तीलगतचा भाग असल्याने दिवसा आत शिरून त्याचा शोध घेणे नागरिकांसाठी धोकादायक आहे. उद्याही दिवसभर शोध घेणार आहोत. आजच्या शोधमोहिमेत नव्याने पगमार्क दिसले नाहीत. कॅमेरे वाढविण्याचे नियोजन आहे.
- विजय गंगावणे, आरएफओ, सेमिनरी हिल्स
...