उपराष्ट्रपती धनखड सपत्निक पोहोचले गडकरींच्या निवासस्थानी
By योगेश पांडे | Updated: August 4, 2023 21:51 IST2023-08-04T21:51:09+5:302023-08-04T21:51:23+5:30
नागपुरी पाहुणचाराने उपराष्ट्रपती भारावून गेले

उपराष्ट्रपती धनखड सपत्निक पोहोचले गडकरींच्या निवासस्थानी
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूर दौऱ्यावर आलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पत्नी डॉ.सुदेश यांच्यासह शुक्रवारी रात्री केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीदरम्यान राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी नागपुरी पाहुणचाराने उपराष्ट्रपती भारावून गेले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारोह व राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (एनएडीटी) भारतीय महसूल सेवेच्या ७६ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी प्रणिती या व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दुपारी नागपुरात आगमन झाल्यावर ते थेट या कार्यक्रमांमध्ये गेले होते. रात्री दिल्लीला परतण्याअगोदर ते अचानक नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानी पोहोचले. यावेळी उपराष्ट्रपतींनी गडकरी यांच्या कुटुंबियांची तसेच नातवंडांची ख्यालीखुशाली विचारली. उपराष्ट्रपतींच्या नियोजित कार्यक्रमात ही भेट नव्हती. त्यामुळे सुरक्षायंत्रणांची तारांबळ उडाली. यावेळी त्यांना नागपुरातील विकासकामांबाबत माहिती देण्यात आली.