कुलगुरू विरुद्ध कुलसचिव
By Admin | Updated: May 22, 2015 02:41 IST2015-05-22T02:41:56+5:302015-05-22T02:41:56+5:30
विद्यापीठात गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येईल, असा संकल्प कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी पदभार स्वीकारताना केला होता.

कुलगुरू विरुद्ध कुलसचिव
नागपूर : विद्यापीठात गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येईल, असा संकल्प कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी पदभार स्वीकारताना केला होता. मात्र परीक्षा नियंत्रक पदासाठी गुरुवारी झालेल्या मुलाखती दरम्यान निवड समितीत झालेला कलगीतुरा लक्षात घेता विद्यापीठातील सत्तासंघर्षात गुणवत्तेला थारा नाही, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून करण्यात आलेली परीक्षा नियंत्रक पदभरतीची प्रक्रिया आता पुन्हा नव्याने घेण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांच्या निवडीसाठी झालेल्या मुलाखतीनंतर निवड समितीने विद्यापीठातील सत्तासंघर्ष अनुभवला. दोन उमेदवारांवरून निवड समितीतील सदस्यांमध्ये दोन गट तयार झाले. एका विशिष्ट सदस्याची बाजू उचलून धरणाऱ्या कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांनी जोरदार विरोध केला.
अंतर्गत राजकारणाचा फटका
नागपूर विद्यापीठात पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नसल्याने परीक्षा व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. आता नवीन प्राधिकरण तयार झाल्यानंतरच परीक्षा नियंत्रक निवडीची प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे. याचाच अर्थ आणखी आठ महिने परीक्षा विभाग प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावरच राहणार आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठातील एका गटाला तिसऱ्याच उमेदवाराला परीक्षा नियंत्रक करायचे होते. परंतु त्यांची निवड होत नसल्याचे पाहून अखेर हा ‘डेडलॉक’ निर्माण करण्यात आला. याअगोदर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुलाखतींदरम्यान एकही पात्र उमेदवार आढळला नव्हता व गुरुवारी झालेल्या मुलाखतींमध्ये पात्र उमेदवार असूनदेखील कोणाचीही निवड होऊ शकली नाही.
कुलगुरूंनी दिला परंपरेला फाटा
नागपूर : विद्यापीठाच्या प्राधिकरणांचा कालावधी संपुष्टात येत असल्यामुळे पूर्णवेळ परीक्षा नियंत्रकासाठी विद्यापीठाला आणखी सहा ते आठ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चित.
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदाच्या निवडीसाठी गुरुवारी १० उमेदवार येणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात पाचच उमेदवार आले. यात शशिकांत आसोले, दिनेश भोंडे, डॉ. ज्ञानेश्वर कडव, डॉ.संतोष कसबेकर, आर.मुलानी यांचा समावेश होता. तर निवड समितीमध्ये कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.एन.एन.मालदार, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.बी.विद्यासागर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.बी.ए.चोपडे, नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.अर्चना नेरकर, डॉ.भरत मेघे, डॉ.के.सी.देशमुख यांचा समावेश होता.
सकाळी ११ च्या सुमारास मुलाखतींना प्रारंभ झाला. २ वाजता निवड समितीचे सर्व सदस्य एकत्र आले. परंतु एकाही उमेदवारावर समितीचे एकमत झाले नाही. मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे व नागपुरातील सिंधू महाविद्यालयातील असोसिएट प्रोफेसर डॉ.संतोष कसबेकर यांच्या नावावर प्रदीर्घ चर्चा झाली. परंपरेला फाटा देत कुलगुरूंनी पहिलेच आपले मत मांडत कसबेकर यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला. नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिनेश भोंडे यांचे नाव समोर केले.
परंतु येणारा परीक्षा नियंत्रक हा माझ्याच हाताखाली काम करणार असल्याने तो नवीन असला तरी चालेल असे मत डॉ.काणे यांनी मांडले.
यानंतर इतर तीनही कुलगुरूंनी कसबेकर यांच्याच नावाला समर्थन दिले. दुसरीकडे कसबेकर यांच्या तुलनेत भोंडे यांचा अनुभव जास्त असून ते परीक्षा विभाग जास्त सक्षमतेने हाताळू शकतील अशी भूमिका इतर चार सदस्यांनी घेतली. सुमारे तीन तास उलटूनदेखील कुठलाच निर्णय होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)