ज्येष्ठ साहित्यिक आशाताई सावदेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 11:37 AM2021-04-22T11:37:40+5:302021-04-22T13:05:04+5:30

Nagpur news; ज्येष्ठ साहित्यिक आशाताई सावदेकर यांचे आज सकाळी निधन झाले.

Veteran writer Ashatai Savdekar passed away | ज्येष्ठ साहित्यिक आशाताई सावदेकर यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक आशाताई सावदेकर यांचे निधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक आशा सावदेकर यांचे येथे गुरूवारी सकाळी निधन झाले. त्या ७२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा आश्विन सावदेकर आहे. तो अमेरिकेत डेनव्हर येथे राहतो.
आशा सावदेकर यांना गेल्या दोन-तीन वर्षांपासून विस्मरण झाले होते. तेव्हापासून त्या सोनेगाव एचबी ईस्टेट परिसरातील विहिनीसोबत राहात होत्या. त्यांच्या देखभालीसाठी एक केअरटेकर ठेवली होती. सावदेकर यांच्यावर वैयक्तिक आपत्ती कोसळल्या. मुलगी अपर्णा दासगुप्ता हीचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर त्या मानसिकरीत्या खूप खचल्या होत्या. पती अरविंद सावदेकर यांचे आठ दहा वर्षापूर्वी निधन झाले. 
आशाताईंना औषध तसेच श्वास घेण्याचेही विस्मरण होत होतं. त्यांचे वैद्यकीय देखभाल त्याचे स्नेही डाक्टर निखिल करीत होते. सावदेकर यांची कोरोना चाचणी व्हायची होती. डाक्टर निखिल हेच अंत्यसंस्कार करतील असे कौटुंबिक स्नेही आशा बगे यांनी सांगितले. त्यांचा नातु मुंबई येथे शिकत आहे.
डॉ.आशा सावदेकर मूळच्या नागपूरच्या असून त्यांचे माहेरचे नाव आशा गजानन भवाळकर आहे. नागपूर येथील भिडे कन्याशाळेत त्यांचे माध्यमिक शिक्षण, तर तिथल्याच नागपूर महाविद्यालयातून त्या १९६८ साली बी.ए. व १९७० साली एम.ए.(मराठी) झाल्या. १९७५ साली त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. ‘कविवर्य भा.रा.तांबे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. पुढे १९७९ साली पुस्तकरूपाने तो प्रसिद्ध झाल्यावर साक्षेपी समीक्षक म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली.

मराठी साहित्यावर ज्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडलेला आहे, अशा अनेक नामवंत प्रतिभावान साहित्यिकांच्या लेखनाची त्यांनी चिकित्सक समीक्षा केली आहे. त्यांमध्ये कथाकार पु.भा.भावे, कादंबरीकार ना.सी.फडके, कवी ज.के.उपाध्ये इत्यादींचा समावेश असून या संदर्भातील त्यांची ‘पु.भा.भावे: साहित्यवेध’ (१९८९), ‘भारतीय साहित्याचे शिल्पकार: ना.सी.फडके’ (१९९५), ‘मुशाफिरी’ (२०००) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

त्यांचा काव्याचा व्यासंग आणि अभ्यास मोठा असून ‘मुशाफिरी’ या नावाने मराठी कवितेची समीक्षा करणारा त्यांचा ग्रंथ २००० साली प्रकाशित झाला आहे. जयकृष्ण केशव उपाध्ये हे विदर्भातील एक मान्यवर कवी होत. त्यांची कविता आशाताईंनी अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह संपादित केली आहे (१९८५).

त्यांचे कविताविषयक महत्त्वाचे संपादन म्हणजे ‘कविता विदर्भाची’ (१९९१). या ग्रंथात त्यांनी विदर्भातील निवडक कवींच्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचे संकलन केले आहे. डॉ.वि.वा.प्रभुदेसाईंच्या सहकार्याने ‘आजचे मराठी साहित्य’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. त्यांचे अनेक समीक्षात्मक लेख वाङ्मयविषयक विविध नियतकालिकांमधून सातत्याने प्रसिद्ध होत असतात. त्या स्वतः ‘युगवाणी’ या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राच्या संपादक (१९८६-१९८९) होत्या. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा अंक क्र.२५०मध्ये (जुलै-सप्टेंबर१९८९) त्यांनी ‘कवी यशवंत: एक आकलन’ या लेखातून यशवंतांच्या कवितेचा परामर्श घेतला आहे. जवळपास ३० वर्षे त्यांनी समीक्षक म्हणून मान्यता मिळविली असली तरी ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ (१९७७) ही एक कादंबरी त्यांच्या नावावर आहे. विदर्भातील ख्यातनाम कवींचा परिचय त्यांनी एका लेखमालेतून करून दिला आहे. त्यांची समीक्षा वस्तुस्थितिनिदर्शक, तरीही आस्वादक आहे

Web Title: Veteran writer Ashatai Savdekar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू