Vendors in the rag cloth market will give them corporation land | चिंधी बाजारातील विक्रेत्यांना मनपा जागा देणार
चिंधी बाजारातील विक्रेत्यांना मनपा जागा देणार

ठळक मुद्देदिव्यांग व गठई कामगारांनाही जागा उपलब्ध करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात तीन ठिकाणी रस्त्यांवर चिंधी बाजार भरतो. या व्यवसायातील लोकांना हक्काच्या जागेत दुकाने लावता यावीत, यासाठी महापालिका त्यांना जागा उपलब्ध करणार आहे. याबाबतचे धोरण व नियमावली तयार केली जात आहे. स्थावर व समाजकल्याण विभागाला यासाठी १५ दिवसात शहरातील पर्यायी जागांचा शोध घेण्याचे निर्देश दिल्याची माहिती विधी समितीचे सभापती अ‍ॅड. धरमपाल मेश्राम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
रेल्वे स्टेशनचे पूर्वेकडील गेट, इतवारी येथील लोहाओळ तसेच सदर भागातील मंगळवारी परिसरात रस्त्यावर चिंधी बाजार भरतो. येथील विक्रे त्यांना ओटे उपलब्ध केले जातील. तसेच दिव्यांग व गठई कामगारांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. झोनस्तरावर यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. एकूण ११५६ अर्ज आले. यात दिव्यांगांचे ६९०, चिंधी विक्रे त्यांचे ३०७ व गठई कामगारांच्या १५९ अर्जाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १०० दिव्यांगांना जागा उपलब्ध करणार असल्याची माहिती मेश्राम यांनी दिली. यावेळी उपायुक्त रंजना लाडे, स्थावर अधिकारी विजय हुमणे उपस्थित होते.

लवकरच धोरण ठरविणार
दिव्यांग, गठई कामगार व चिंधी व्यवसायातील लोकांना जागा उपलब्ध करण्यासंदर्भात महापालिका धोरण तयार करणार आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी केली जाईल. महापालिकेतर्फे गठई कामगारांना रस्त्यांच्या फूटपाथवर जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर दिव्यांग व चिंधी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करण्याचा विचार आहे. मात्र चिंधी व्यावसायिकांना बाजारात ओटे वाटप करण्याचा मनपाचा विचार आहे.

Web Title: Vendors in the rag cloth market will give them corporation land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.