वेलतूर आराेग्य केंद्र आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST2021-01-08T04:22:37+5:302021-01-08T04:22:37+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : परिसरातील ४१ गावांतील नागरिकांच्या आराेग्याची जबाबदारी असलेल्या येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात विविध समस्यांनी डाेके ...

वेलतूर आराेग्य केंद्र आजारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
वेलतूर : परिसरातील ४१ गावांतील नागरिकांच्या आराेग्याची जबाबदारी असलेल्या येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात विविध समस्यांनी डाेके वर काढल्याने उपचारासाठी येणारे रुग्ण व नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागताे. आराेग्य केंद्रात एमबीबीएस डाॅक्टरसह अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. शिवाय या केंद्रांतर्गत असलेल्या उपकेंद्रातही कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांना इतरत्र भटकावे लागत आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, पुरेशा कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे हे आराेग्य केंद्रच आजारी आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या चार वर्षांपासून एकही एमबीबीएस डाॅक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे शवविच्छेदनासाठी मृतदेह मांढळ किंवा कुही येथे न्यावा लागताे. जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांनी येथे एमबीबीएस डाॅक्टर नियुक्त करण्याचे आश्वासन दिले. मात्र चार वर्षांचा काळ उलटूनही या ठिकाणी एमबीबीएस डाॅक्टर नियुक्त झालेला नाही.
या प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत एकूण आठ उपकेंद्रांचा समावेश आहे. ४१ गावातील सुमारे ३० हजार लाेकसंख्येच्या आराेग्याची जबाबदारी या आराेग्य केंद्रावर आहे. या आराेग्य केंद्राची ही अवस्था असताना आठ उपकेंद्राच्या स्थितीबाबत कल्पनाच न केलेली बरी. परिसरातील फेगड, भिवापूर, साेनारवाई, नवेगाव (सिर्सी), आंभाेरा आदी गावातील रुग्ण वेलतूर येथेच उपचारासाठी येतात. परंतु आराेग्य केंद्रात गैरसाेईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकात कमालीची नाराजी आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरून समस्या मार्गी लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे.
...
कर्मचाऱ्यांची निवासस्थाने समस्याग्रस्त
तीन वर्षांपूर्वी प्राथमिक आराेग्य केंद्रात पाणी गळती लागली हाेती. शिवाय, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आराेग्य केंद्रातील समस्यांवर आळा घालण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आराेग्य अभियान हा स्तुत्य उपक्रम असला तरी या अभियानात पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने या समस्यांचे निराकरण हाेईल की नाही, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.