उन्हाळ्यात भाज्या स्वस्तच!
By Admin | Updated: June 5, 2014 01:04 IST2014-06-05T01:04:57+5:302014-06-05T01:04:57+5:30
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्यात गृहिणींसाठी भाज्या स्वस्तच आहे. नागपूरलगतच्या भागात सिंचनाच्या सोयी वाढल्याने स्थानिक उत्पादकांकडून भाज्याची मोठय़ा प्रमाणात आवक आहे.

उन्हाळ्यात भाज्या स्वस्तच!
स्थानिकांची आवक वाढली : कांदे महागणार
नागपूर : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्यात गृहिणींसाठी भाज्या स्वस्तच आहे. नागपूरलगतच्या भागात सिंचनाच्या सोयी वाढल्याने स्थानिक उत्पादकांकडून भाज्याची मोठय़ा प्रमाणात आवक आहे. काही भाज्या वगळता किरकोळमध्ये टमाटर, वांगे, पत्ता कोबी, कोहळे, तोंडले या भाज्याचे दर १0 रुपयांच्या घरात आहे. जूनमध्येही आवक वाढण्याच्या अपेक्षेने गृहिणींचा महिन्याचा खर्च आटोक्यात राहील.
नागपूर जिल्ह्यात सिंचनामुळे सध्या भाज्यांची लागवड आणि उत्पादन वाढले आहे. यंदाच्या लग्नसराईत किफायत दरात मुबलक भाज्या उपलब्ध आहेत. तीन महिन्यांआधी मुसळधार पावसामुळे भाज्या खराब झाल्या होत्या. तेव्हा शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणात भाज्यांची लागवड केली. ते उत्पादन आता बाजारात येत आहे. सध्या लहानमोठय़ा २00 पेक्षा जास्त गाड्यांची आवक असल्याची माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली.
नाशिकहून टमाटरची आवक
स्थानिकांसह बाहेरूनही भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणात आहे. नाशिक येथून टमाटर येत असून कॉटन मार्केटमध्ये भाव सहा रुपयांवर आहेत. मटर जबलपूर येथून, गाजर दिल्ली आणि सिमला मिरची दिग्रसवरून, नाशिक येथून टमाटर, रायपूर येथून तोंडले, ओरिसातून फणस आणि जगदलपूर येथून हिरवी मिरची येत आहे. (प्रतिनिधी)
कांदे महागणार!
कळमन्यात सध्या कांद्याची आवक कमी झाली असून १५ दिवसात कांदे महाग होण्याची शक्यता आहे. आवक १२ ते १५ ट्रकपर्यंंंत कमी झाली आहे. उन्हाळी कांदा स्टोअर करता येतो. त्यामुळे शेतकर्यांनी माल साठवून ठेवला. गरज पडेल तेव्हा विक्रीस काढण्याचे शेतकर्यांचे धोरण असल्याने पुढे कांदा महागच मिळेल. बुलढाणा येथून लाल कांदा तर अमरावती व अकोला येथून पांढरा कांदा येत आहे. अहमदनगर येथून एक किंवा दोन ट्रक आवक आहे. कळमन्यात भाव प्रति किलो ११ ते १२ रुपयांवर होते. काही दिवसात १५ रुपयांवर जाईल, अशी माहिती कळमन्यातील आलू-कांदा असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी दिली.
किरकोळमध्ये बटाटे २५ रुपये!
छिंदवाडा, आग्रा, कानपूर, अहमदाबाद येथील बटाटे बाजारात विक्रीस येत आहेत. दररोज १२ ते १३ ट्रकची आवक आहे. रविवारी चांगल्या प्रतीच्या बटाट्याचे भाव १६ ते १८ रुपये किलो होते. किरकोळमध्ये २५ रुपये दर आहेत.