वीणा बजाज यांना न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: October 10, 2015 02:54 IST2015-10-10T02:54:43+5:302015-10-10T02:54:43+5:30
भ्रष्टाचाराच्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटका येथील ओंकारलाल सिंधू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वीणा दीपक बजाज ...

वीणा बजाज यांना न्यायालयीन कोठडी
नागपूर : भ्रष्टाचाराच्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटका येथील ओंकारलाल सिंधू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वीणा दीपक बजाज यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के.जी. राठी यांच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्यांची कारागृहाकडे रवानगी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वीणा बजाज यांना ६ आॅक्टोबर रोजी अटक करून त्यांचा ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता.
वीणा बजाज यांचे पती दीपक खूबचंद बजाज यांच्याविरुद्ध अपसंपदेबाबतचा तपास सुरू असताना वीणा बजाज यांच्याविरुद्ध बऱ्याच तक्रारी आणि पुरावे आढळून येताच त्यांना अटक करण्यात आली होती. दीपक बजाज यांना सचिव या नात्याने शाळेत शिक्षकांची नेमणूक करण्याचे अधिकार असताना त्यांनी प्रतीक घोडे नावाच्या चित्रकला शिक्षकाची नेमणूक करण्याचे अधिकार आपली पत्नी वीणा बजाज यांना दिले होते. वीणा बजाज यांनी एकटीने ५ नोव्हेंबर २०१४ रोजी घोडे यांची मुलाखत घेतली होती. त्यांनी प्रतीक घोडेला १० लाखांची मागणी केली होती. त्यापैकी तीन लाख रुपये आधी घेतले होते.
कोऱ्या स्टॅम्पपेपरवर घोडे यांची सहीही घेतली होती. घोडे हा वारंवार मागणी करूनही सात लाख रुपये देत नसल्याने त्याला राजीनामा देण्यासाठी वारंवार धमक्या देऊन मानसिक त्रास देण्यात आला होता. पुढे तो पैसे देऊ न शकल्याने त्याला १० महिन्यांतच कामावरून काढून टाकण्यात आले होते. न्यायालयाने वीणा बजाज यांना न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावताच त्यांच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला.
अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)