विविध प्रशिक्षण केंद्र एका छताखाली
By Admin | Updated: June 19, 2016 02:58 IST2016-06-19T02:58:46+5:302016-06-19T02:58:46+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामार्फत वेगवेगळ्या जागी विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण केंद्र चालविले जातात.

विविध प्रशिक्षण केंद्र एका छताखाली
पूरण मेश्राम : सहा कोटींच्या विविध कामांना वित्त विभागाची मंजुरी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामार्फत वेगवेगळ्या जागी विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण केंद्र चालविले जातात. ही सर्व प्रशिक्षण केंद्रे एकाच छताखाली आणण्यात येणार असून, स्वतंत्र इमारतीसाठी वित्त विभागाने १ कोटी ८० लाखाच्या कामाला मंजुरी दिली असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांनी दिली.
विद्यापीठामार्फत वेगवेगळ्या विभागांमध्ये नेट-सेट, यूपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन आदी प्रशिक्षण केंद्रे चालविले जातात. आता हे सर्व प्रशिक्षण एकाच इमारतीमध्ये मिळणार असून, यासाठी प्रशासकीय इमारतीजवळची जागा निश्चित करण्यात आल्याचे मेश्राम यांनी सांगितले. यामध्ये प्रशिक्षणासह अद्ययावत वाचनालय आणि इतर सोयीसुविधा राहणार असल्याचे ते म्हणाले. यासोबतच विद्यापीठाच्या वाणिज्य विभागासाठी स्वतंत्र इमारतीच्या बांधकामालाही मंजुरी देण्यात आली आहे. वाणिज्य विभागाची स्वतंत्र इमारत असावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. आता हा प्रस्ताव मार्गी लागला असून, यासाठी १ कोटी ८० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ९० लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यात आल्याचेही पूरण मेश्राम यांनी स्पष्ट केले. याशिवाय व्यवसाय प्रबंधन विभागाच्या इमारतीच्या विस्तारीकरणाचा ५२ लाख ९४ हजार रुपयाचा प्रस्ताव, एलआयटीच्या वाचनालयाच्या इमारतीच्या विस्तारीकरणासाठी ७१ लाख ७४ हजार रुपये आणि गणित विभागाच्या इमारतीच्या विस्तारीकरणासाठी १ कोटी ५९ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याचे मेश्राम यांनी यावेळी नमूद केले. ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहेत. बांधकाम विभाग लवकरच या कामांचे कंत्राट काढून पावसाळ्यानंतर ही सर्व कामे सुरू केली जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जवळपास सव्वासहा कोटींच्या या कामांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) निधी देण्यात येणार असून, उर्वरित रक्कम विद्यापीठामार्फत खर्च केली जाणार असल्याचे मेश्राम यांनी स्पष्ट केले.
विदर्भातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात, असा कांगावा केला जातो. याचे कारण संपूर्ण विदर्भात विविध स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था नसल्याने ही स्थिती असल्याचे ते म्हणाले. यासाठी निवासी प्रशिक्षण केंद्राचा ४२ कोटींचा प्रस्ताव बार्टीला पाठविण्यात आल्याचे पूरण मेश्राम यांनी यावेळी सांगितले. यामध्ये प्रशासकीय इमारत, १०० मुली व १०० मुलांसाठी दोन निवासी वसतिगृह, प्रशिक्षण कें द्र, वाचनालय आदींची व्यवस्था राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
खानोरकर यांच्यावर अनुशासनहीनतेची
कारवाई होणार
विद्यापीठाचे उच्च श्रेणी लिपीक राजेश खानोरकर यांच्यावर अनुशासनहीनतेची कारवाई करण्यात येणार असल्याचे पूरण मेश्राम यांनी यावेळी सांगितले. खानोरकर यांनी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात लेखी स्वरूपात निराधार, चुकीचे आणि बदनामकारक आरोप करून अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप मेश्राम यांनी यावेळी केला. निराधार आरोप करून अधिकारी, कुलसचिव आणि कुलगुरूंना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न चालविला जात असून विद्यापीठाची बदनामी करुन वेठीस धरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. खानोरकर यांना १५ जूनला निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी बसविणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अशोभनीय वर्तन करून विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांची यादीच तयार करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यास विद्यापीठ मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे राजेश खानोरकर गेल्या काही दिवसापासून विद्यापीठासमोर उपोषणाला बसले असून त्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.