बाजीराव गल्लीत वाहनांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:08 IST2021-01-19T04:08:49+5:302021-01-19T04:08:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडांच्या टोळक्याने रविवारी मध्यरात्री हैदोस घातला. आरडाओरड करीत बाजीराव गल्लीतील ...

बाजीराव गल्लीत वाहनांची तोडफोड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडांच्या टोळक्याने रविवारी मध्यरात्री हैदोस घातला. आरडाओरड करीत बाजीराव गल्लीतील वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात सकाळपासून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवधर मोहल्ल्यात शिवमंदिर आहे. मंदिराजवळच्या बाजीराव गल्लीत अरुण मारोती बाजीराव राहतात. रविवारी मध्यरात्री त्यांना तोडफोड आणि आरडाओरड ऐकू आल्याने परिवारातील सदस्यांसह ते घराबाहेर आले. घरासमोर ठेवलेल्या दुचाक्यांची ५ ते ६ सशस्त्र गुंड तोडफोड करीत होते. ते पाहून बाजीराव जोरात ओरडले. आवाज ऐकून शेजारीही धावले, त्यामुळे आरोपी पळून गेले. आरोपींनी बजाज कॅलिबर, पल्सर आणि ड्रीम युगा अशा तीन मोटरसायकलची तोडफोड केली. सोमवारी सकाळपासून या वाहन तोडफोडीच्या घटनेचे वृत्त परिसरात कळाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटली. दोन महिन्यांपूर्वी बेसा, बेलतरोडी, मनीषनगर, अजनी आणि तत्पूर्वी कॉटन मार्केट परिसरात अशाच प्रकारे वाहन फोडण्याच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी कडक कारवाई करूनही पुन्हा आता तहसीलमध्ये ही घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
---
लकडगंजकडे पळाले आरोपी
बाजीराव गल्लीत वाहनांची तोडफोड करणारे आरोपी फटाका बुलेटचा वापर करीत होते, अशी चर्चा आहे. ते लकडगंजकडे पळून गेल्याचेही प्राथमिक तपासात उजेडात आले आहे. तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
----