'वंचित'चे उमेदवार मतांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 08:55 PM2019-10-25T20:55:25+5:302019-10-25T20:56:45+5:30

विधानसभेत ‘वंचित’ काय चमत्कार करते, याकडे लक्ष लागले होते. परंतु नागपूर जिल्ह्यातील मतदारांनी तरी ‘वंचित’ला नाकारले असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मतांपासून वंचित राहिले.

Vanchit candidate deprived of votes | 'वंचित'चे उमेदवार मतांपासून वंचित

'वंचित'चे उमेदवार मतांपासून वंचित

googlenewsNext
ठळक मुद्देनागपुरातील जनतेने विधानसभेतही नाकारले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात भारिप बहुजन महासंघ प्रणित वंचित बहुजन आघाडीने मागील दोन-एक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात एक वादळ निर्माण केले आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना होणारी लाखोंची गर्दी पाहता, ही वंचित एक नवीन राजकीय शक्ती म्हणून उदयास येईल, असे भाकीत वर्तविले जाऊ लागले. अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचे काहिसे पडसाद पाहायला मिळाले. त्यामुळे विधानसभेत ‘वंचित’ काय चमत्कार करते, याकडे लक्ष लागले होते. परंतु नागपूर जिल्ह्यातील मतदारांनी तरी ‘वंचित’ला नाकारले असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मतांपासून वंचित राहिले.
काही महिन्यांपूर्वीच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लाखावर मते घेतली. औरंगाबाद येथील एमआयएमचा उमेदवार निवडूनही आला. राज्यात तब्बल ४१ लाखावर मते वंचितच्या उमेदवारांना मिळाली. नागपूरचा विचार केला तर नागपूर लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सागर डबरासे यांना २६,१२८ मते मिळाली होती तर रामटेकमधून किरण रोडगे (पाटणकर) यांनी ३६,३४० मते घेतली. दोन्ही उमेदवारांची मते मिळून एकूण ६२,४६८ मते वंचितला मिळाली. वंचितच्या राज्यातील इतर उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत ही मते खूपच कमी होती. एकूणच लोकसभा निवडणुकीत नागपुरातील मतदारांनी वंचितच्या उमेदवारांना नाकारले होते. विधानसभेतही तेच चित्र पाहायला मिळाले. नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी नागपूर पश्चिम मतदार संघ वगळता सर्व ११ विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात होते. या सर्वांना मिळून ६६,५९० मते मिळली. जवळपास लोकसभेत मिळालेल्या मतांएवढीच ही मते आहे. यात केवळ ४ हजार मतांची वाढ झाली इतकेच. यात सर्वाधिक १५,३७१ मते हिंगणा मतदार संघातून नितेश जंगले यांनी घेतली. त्यानंतर कामठीमधून राजेश काकडे यांनी १०,६०१, तर दक्षिण-पश्चिममधून रवी शेंडे यांनी ८८२१ मते घेतली. नागपूर दक्षिणमधून रमेश पिसे यांनी ५५८३, नागपूर उत्तरमधून विनय भांगे यांनी ५५९९, नागपूर पूर्वमधून मंगलमूर्ती सोनकुसरे यांनी ४३३८, काटोलमधून दिनेश टुले यांनी ५८०७, रामटेकमधून भगवान भोंडे यांनी २२६७, सावनेरमधून १७५० आणि उमरेडमधून वृक्षदास बन्सोड यांनी ५९३१ मते घेतली.

एमआयएम सरस
खा. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम हा पक्ष वंचित बहुजन आघाडीचा घटक पक्ष होता. लोकसभेत त्यांचा एक खासदारही निवडून आला. परंतु विधानसभेत मात्र एमआयएम वंचितमधून बाहेर पडला. नागपूरचा विचार केला तर नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारापेक्षा एमआयएमचे उमेदवार सरस ठरल्याचे दिसून येते. एमआयएमने येथून तीन मतदार संघात आपले उमेदवार उभे केले होते. यात उत्तर नागपुरातून एमआयएमच्या उमेदवार कीर्ती डोंगरे यांनी ९३१८ मते घेतली. येथे वंचितच्या उमेदवाराला केवळ ५५९९ मते मिळाली. मध्य नागपुरात वंचितचे उमेदवार कमलेश भगतकर यांना १६१२ मते मिळाली तर एमआयएमचे उमेदवार अब्दुल शाकीर पटेल यांनी ८५६२ मते घेतली. इतकेच नव्हे तर येथे एमआयएमचे उमेदवार विजयाचे गणित बदलवण्यास कारणीभूत ठरले. केवळ कामठी मतदार संघात वंचितचे राजेश काकडे यांनी १०,६०१ तर एमआयएमचे शाकीबुर रहेमान यांनी ८३४५ मते घेतली. एकूण नागपुरात तरी वंचितपेक्षा एमआयएम सरस ठरल्याचे दिसून येते.

पुन्हा जोमाने काम करू
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यात पुढे जात आहे. आम्ही विजय मिळवू शकलो नाही तर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर मते मिळत आहे. नागपुरात मात्र अजूनही लोकांचा विश्वास आम्ही संपादित करू शकलो नाही. याबाबत कुठलीही नाराजी नाही. काँग्रेस भाजपच्या धनशक्तीपुढे आम्ही कमी पडलो तरी आम्ही हार मानलेली नाही. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आणखी जोमाने काम करू, लोकांचा विश्वास संपादित करण्याचा प्रयत्न करु.
रवि शेंडे
शहराध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ

 

 

Web Title: Vanchit candidate deprived of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.