रक्तदान करून वाहिली बाबूजींना आदरांजली
By Admin | Updated: July 3, 2015 02:55 IST2015-07-03T02:55:04+5:302015-07-03T02:55:04+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त नागपूरसह

रक्तदान करून वाहिली बाबूजींना आदरांजली
जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती साजरी :
राज्यभरात शेकडो बाटल्या रक्तसंकलन, महिलांची संख्या लक्षणीय
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त नागपूरसह राज्यभरात गुरुवारी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. सर्व ठिकाणी शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शेकडो बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. भंडारा, गोंदिया, गोवा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि औरंगाबाद या ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिरे पार पडली.
लोकमत आणि लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट व अप्रायसेस सेंटरच्यावतीने नागपुरात लोकमत भवनातील ‘बी’ विंग ११ व्या माळ्यावर आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाले. या प्रसंगी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट व अप्रायसेस सेंटरचे संचालक डॉ. हरीश वरभे यांच्यासह ‘लोकमत’च्या विविध विभागातील प्रमुख उपस्थित होते.
शिबिराची सुरुवात अभय वाकडे, अॅडलर डिसुझा, केदार कुलकर्णी, अरुणा हजारे, आरती राजदेरकर या पाच रक्तदात्यांनी आधी रक्तदान करून केली. या शिबिरात तरुणांसोबतच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. एक सामाजिक जाणीव म्हणून लोकमतचे वाचक, कर्मचारी, युवा नेक्स्टचे सदस्य व सखी मंच सदस्यांनी शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. १८ ते ६१ वर्षांपर्यंतच्या दात्यांनी रक्तदान केले. सकाळी १०.३० वाजतापासून सुरू झालेल्या या शिबिरात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत रक्तदात्यांची गर्दी होती. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी स्वातंत्र्य सेनानी व माजी आमदार यादवराव देवगडे, लोकमतचे वित्त नियंत्रक मोहन जोशी, सहायक उपाध्यक्ष संजय खरे, सहायक उपाध्यक्ष राम सावजी, सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग, उपमहाव्यवस्थापक आशिष जैन, मानव संसाधन वरिष्ठ व्यवस्थापक विवेक घोडवैद्य, प्रेम लुणावत, रणजितसिंह बघेल, मानकचंद सेठिया, मोरेश्वर जाधव, देवीदास देशमुख व लोकमत परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते. संचालन सखी मंच संयोजिका नेहा जोशी यांनी केले. या वेळी रक्तदात्यांना रक्तदान कार्ड, प्रमाणपत्र, प्राथमिक उपचार पेटी देण्यात आली.
शिबिरात रक्तदात्यांना रक्तगट तपासणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. शिबिरासाठी लाईफ लाईन रक्तपेढीचे डॉ. अर्पणा सागरे, डॉ. प्रीती बम्बाळ, रवी गजभिये, अंकिता सांगोळे, सुवर्णा रोडे, रश्मी दडमल, उर्वशी रेहपाडे, सपना उके, हीना पटेल, रसिका वैद्य, साहिल सय्यद, वृंदावन कुंदवळे, दीपस्तंभ फुलकर, नौशाद अहमद, रविना पायघन, भूषण शहस्त्रकार, इमरान शेख व हरीश ठाकूर आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
अपंग सुनील शहाणे यांचे ४७ वे रक्तदान
झिंगाबाई टाकळी येथील ६१ वर्षीय सुनील माणिकराव शहाणे यांनी या शिबिरात ४७ वे रक्तदान केले. दोन्ही पायाने अपंग असलेले शहाणे हे गेल्या सहा वर्षांपासून बाबूजींच्या जयंतीदिनी आयोजित या शिबिरात रक्तदान करीत आहेत. शहाणे म्हणाले, रक्ताने दुसऱ्याचा जीव वाचतो. रक्तदान करण्यासारखे दुसरे पुण्य नाही. रक्तदानाची सुरुवात १९९८ मध्ये केली. तेव्हापासून दर तीन ते सहा महिन्यांनी रक्तदान करतो. अनेकदा रात्रीही गरजूंना रक्तदान केले आहे. हे पुण्य अपंगासह, स्त्री, पुरुष सर्वांनी आपल्या पदरात पाडून घ्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.
कामातून वेळ काढत केले रक्तदान
औरंगाबाद येथील अॅड. अशोक राऊत एका प्रकरणाच्या संदर्भात नागपूरच्या उच्च न्यायालयात आले असताना ‘लोकमत’चे वृत्त वाचून या रक्तदान शिबिरात सहभागी झाले. अॅड. राऊत म्हणाले, वयाच्या १९ व्या वर्षापासून रक्तदान करीत आहे. हे ४० वे रक्तदान आहे. रक्तदान केल्याचे समाधान शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.
प्रज्ञा, मेघा, अश्विनीने केले पहिल्यांदाच रक्तदान
प्रज्ञा बॅनर्जी, मेघा गाणार आणि अश्विनी ठाकरे या तरुणींनी पहिल्यांदाच रक्तदान केले. त्या म्हणाल्या, आतापर्यंत रक्तदानाविषयी अनेक गैरसमज होते. रक्तदानाविषयी माहिती घेतल्यावर कधी एकदा रक्तदान करते, असे झाले होते. ‘लोकमत’ने आवाहन केल्यावर आज पहिल्यांदा रक्तदान केले. रक्तदानाचे समाधान मोठे आहे.
तीन मित्रांचा सहभाग
आदित्य मौर्या, नितीन वानखेडे आणि हर्षद परमार या तीन मित्रांचा चित्रपट जाण्याचा बेत होता. चित्रपट कुठे लागला यासाठी ‘लोकमत’ वृत्तपत्र चाळत असताना रक्तदान शिबिराचे वृत्त त्यांच्या वाचण्यात आले. त्यांनी आपला ‘प्लॅन’ चेंज केला आणि धडकले शिबिरात. ते म्हणाले, आम्ही तिन्ही मित्रांनी मिळून असे पहिल्यांदाच रक्तदान केले. हा क्षण आमच्या नेहमी आठवणीत राहील.
कुणाच्या तरी आयुष्यात हसू उमलण्यासाठी
गिट्टीखदान येथील धनंजय पाटील म्हणाले, कॉलेज जीवनापासून रक्तदान करीत आहे. कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी, कुणाच्या तरी आयुष्यात हसू उमलण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे आहे.
महाजन यांचे ८५ वेळा रक्तदान
सुरेंद्रनगर येथील डॉ. बालकृष्ण महाजन यांनी शिबिरात आपले ८५ वे रक्तदान केले. ते म्हणाले, वयाच्या १८ व्या वर्षीपासून रक्तदान करीत आहे. एनसीसीमध्ये असताना रस्त्यावर एका इसमाचा अपघात झाला. त्यावेळी त्यांना मदत करीत रक्ताचीही गरज भागविली. तेव्हापासून वर्षातून चार वेळा रक्तदान करीत आहे.
रक्तदान, सर्वश्रेष्ठ दान
६० वे रक्तदान करणारे लोकमत कुटुंबातील अरविंद बावनकर म्हणाले, दर दोन सेकंदांनी कोणा ना कोणा व्यक्तीला रक्ताची गरज भासते. रक्तामुळे एकाच वेळी अनेकजणांचे प्राण वाचू शकतात. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणूनच वर्षातून तीन तर कधी चार वेळा रक्तदान करतो. शहरातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान करीत आलो आहे, पुढेही हे कार्य सुरू राहणार आहे.