गर्दीच्या धास्तीने खासगी केंद्रावर जाऊन घेतली जाते लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 11:56 IST2021-07-14T11:55:49+5:302021-07-14T11:56:58+5:30

Nagpur News नागपुरात जवळपास ८२ हजार ५०० नागरिकांनी लसीकरणासाठी खासगी केंद्राला पसंत केले आहे.

The vaccine is taken at a private center for fear of congestion | गर्दीच्या धास्तीने खासगी केंद्रावर जाऊन घेतली जाते लस

गर्दीच्या धास्तीने खासगी केंद्रावर जाऊन घेतली जाते लस

ठळक मुद्दे ८२ हजारावर लोकांचे खासगीत लसीकरण

 लोकमत न्यूज नेटवर्क  
नागपूर : लसीचा वारंवार पडत असलेला तुटवडा यामुळे लसीकरण केंद्रावर उसळणारी गर्दी, यातून संभाव्य कोरोनाचा धोका या धास्तीने खासगी केंद्रावर पैसे देऊन लस घेण्याचे प्रमाण वाढले आहे. नागपुरात जवळपास ८२ हजार ५०० नागरिकांनी लसीकरणासाठी खासगी केंद्राला पसंत केले आहे.

नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ४२ लाख ३० हजाराच्यावर गेली आहे. जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात आतापर्यंत १२,६७,५४० लोकांनी पहिला डोस घेतला आहे. याची टक्केवारी २९.८६ टक्के आहे. परंतु त्यातुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ४,०३,८१३ आहे. ही टक्केवारी केवळ ९.५४ टक्के आहे. थंडावलेल्या लसीकरणामागे लसीचा तुटवडा हे महत्त्वाचे कारण आहे. प्रशासनाला लसीचा साठा उपलब्ध झाल्यावर सर्वच केंद्रावर गर्दी उसळते. कोरोना संसर्गाचा धोकाही संभवतो. त्यामुळे खासगी रुग्णालयात पैसे देऊन लस टोचून घेण्याकडे लोकांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

-लसीकरणासाठी जाऊन कोरोना आणणे परवडत नाही

मनपाच्या व शासकीय रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर लस कधी उपलब्ध होईल, ही शाश्वती नाही. लस उपलब्ध झाल्यावर सर्वच केंद्रावर गर्दी उसळते. या गर्दीला नियंत्रण करण्याची विशेष यंत्रणा नाही. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होत नाही. यामुळे अशा केंद्रांवर लसीकरणासाठी जाऊन कोरोना आणणे परवडत नसल्याने खासगीमध्ये लस घेतली.

-मनीष वझलवार, संचालक वझलवार ड्रायव्हिंग स्कूल

-खासगीमध्ये सोयींकडे विशेष लक्ष

खासगी रुग्णालयात पैसे देऊन लस घेणाऱ्यांकडे व तेथील सोयींकडे विशेष लक्ष दिले जाते. ‘को-विन अ‍ॅपवर’ किंवा ‘ऑफलाईन’वर ही नोंदणी होते. दिलेल्या वेळेत पोहोचल्यास १० मिनिटात लस दिली जाते. विशेष म्हणजे, खासगीमध्येही १८ ते ४४ या वयोगटासाठी लसीकरण खुले करण्यात आल्याने याचा फायदा होत आहे.

-स्नेहल मून, आयटी कंपनी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: The vaccine is taken at a private center for fear of congestion