नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST2021-01-13T04:16:55+5:302021-01-13T04:16:55+5:30

१६ जानेवारीपासून शहरात कोविड लसीकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - महापालिकेद्वारे लसीकरणासंदर्भात आवश्यक तयारी पूर्ण केली असून, ...

Vaccination of registered health workers in the first phase | नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस

नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस

१६ जानेवारीपासून शहरात कोविड लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - महापालिकेद्वारे लसीकरणासंदर्भात आवश्यक तयारी पूर्ण केली असून, १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाची आठ केंद्रात सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड ॲपवर नोंदणी केली आहे, त्याच कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

लसीकरणासंदर्भात सोमवारी मनपा मुख्यालयात आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बैठक घेतली. निर्धारित वेळेच्या आधीच पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्यासह सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रतिनिधी, सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मनपाच्या सदर रोगनिदान केंद्र, महाल रोगनिदान केंद्र, पाचपावली सूतिकागृह, केटीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), एम्स, डागा हॉस्पिटल या आठ ठिकाणच्या कोविड लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. प्रत्येक केंद्रावर १०० कर्मचारी याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर मनपाचे चार आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी तैनात राहतील. प्रत्येक झोनस्तरावर झोनल वैद्यकीय अधिकारी लसीकरणाचे समन्वय करतील, अशी माहिती राम जोशी यांनी दिली.

...

ऐच्छिक व नि:शुल्क लस

कोविड ॲपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असली तरी, ती बंधनकारक करण्यात आलेली नाही. लस ही ऐच्छिक व नि:शुल्क आहे. सध्या शहरात आठ केंद्रावर लसीकरण होणार असून, लवकरच या केंद्रांची संख्या वाढवून ५० पर्यंत केली जाणार आहे. यामध्ये शासकीय रुग्णालय, मनपाच्या आरोग्य केंद्रांसह खासगी रुग्णालयांचाही समावेश राहणार आहे. लसीकरणाच्या २४ तास अगोदर ‘एसएमएस’वरून केंद्राची माहिती, वेळ आदी माहिती दिली जाईल. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

...

Web Title: Vaccination of registered health workers in the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.