उत्तर प्रदेशातील लुटारूंची टोळी जेरबंद
By Admin | Updated: June 12, 2017 02:26 IST2017-06-12T02:26:07+5:302017-06-12T02:26:07+5:30
कोराडी महादुला परिसरातील दोन घरांवर धाड घालून गुन्हेशाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील लुटारूंना ताब्यात घेतले.

उत्तर प्रदेशातील लुटारूंची टोळी जेरबंद
कोराडीत गुन्हेशाखेची कारवाई : दहशतवादी असल्याच्या चर्चेने सर्वत्र खळबळ : पोलिसांनी केला इन्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोराडी / नागपूर : कोराडी महादुला परिसरातील दोन घरांवर धाड घालून गुन्हेशाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील लुटारूंना ताब्यात घेतले. दरम्यान, पकडण्यात आलेले संशयित दहशतवादी असल्याचे वृत्त रविवारी सायंकाळी सर्वत्र पसरल्याने तपास यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ते दहशतवादी नाही तर उत्तर प्रदेशमध्ये राहणारे लुटारू आहेत, असा खुलासा केल्याने उलटसुलट चर्चेला विराम मिळाला.
कोराडी नजीकच्या महादुला येथील श्रीवासनगरात सुवर्णा सोळंकी आणि भोजराज बोरकर यांची घरे काही अंतरावर आहेत. ६ जूनला सोळंकी यांच्याकडे पाच जण, तर ७ जूनला बोरकर यांच्याकडे पाच जण भाड्याने राहायला आले. घरमालक सोळंकी यांनी त्यांचा पत्ता ठिकाण आणि ओळखपत्र विचारले.
संशयास्पद वर्तन
सूत्रांच्या माहितीनुसार, खेळणी विकतो, असे सांगणारे हे सर्वजण पहाटे ५ वाजता घराबाहेर पडायचे. सकाळी ८ वाजता ते परत यायचे आणि नंतर स्वत:ला आपल्या खोल्यांमध्ये कोंडून घ्यायचे. तीन-चारच दिवस झाल्यामुळे घरमालक अथवा आजूबाजूच्यांनी त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही.दरम्यान, सोळंकी आणि बोरकर यांच्याकडून पहाटे झालेल्या कारवाईची माहिती कर्णोपकर्णी सर्वत्र पसरली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ७ ते १० दहशतवाद्यांना पकडून नेल्याचे वृत्तही पसरले. परिणामी त्याबाबत वरिष्ठांकडे विचारणा होऊ लागली. या कारवाईची माहिती गुन्हेशाखेव् यतिरिक्त अन्य कुणाकडेच नव्हती. त्यामुळे उलटसुलट चर्चेत भर पडली. सहपोलीस आयुक्त, अनेक उपायुक्त, दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी, एएनओचे अधिकारी अशा सर्वांकडेच विचारणा होऊ लागली. परिणामी तपास यंत्रणांमध्ये खळबळ निर्माण झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी गुन्हे शाखेशी संपर्क केला. त्यानंतर दहशतवादी नव्हे तर उत्तर प्रदेशमधील लुटारूंची टोळी पकडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनीही दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे अफवा असल्याचे सोशल मीडियावर संदेश टाकून स्पष्ट केले.