सेक्स रॅकेटच्या कलेक्शनसाठी अल्पवयीन मुलाचा वापर
By योगेश पांडे | Updated: August 1, 2024 16:42 IST2024-08-01T16:41:17+5:302024-08-01T16:42:52+5:30
Nagpur : पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या अड्ड्याचा भंडाफोड

Use of minor for collection in sex racket
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर पैशांच्या कलेक्शनसाठी महिला आरोपीकडून चक्क अल्पवयीन मुलाचा वापर करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या अड्ड्याचा भंडाफोड झाला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
पागलखाना चौकाजवळील चिटणवीस नगर ले आऊटमधील आकार बिल्डर्सच्या फ्लॅट क्रमांक १८ मध्ये देहव्यापाराचा अड्डा चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे बुधवारी चार वाजताच्या सुमारास बोगस ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्याने ‘आ जाओ’ असा इशारा केल्यावर पोलिसांनी तेथे धाड टाकली असता तेथे दोन दोन महिला आढळून आल्या. आरोपी फिरोज खान अब्दुल्ला खान (५२, गड्डीगोदाम, सुंदरबाग) व अपर्णा नावाची महिला हा अड्डा चालवत होते. अपर्णा पैसे जमा करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाची मदत घेत होती. गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवत देहव्यापार करवून घेतला जात होता. ग्राहकांकडून १,२०० ते दीड हजार रुपये घेऊन महिलांना पाचशे रुपये दिले जायचे. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मोबाईल जप्त केले. आरोपींविरोधात सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम १४३(३), ३(५) तसेच पिटा ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना सदर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.