युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार
By Admin | Updated: July 24, 2015 02:55 IST2015-07-24T02:55:18+5:302015-07-24T02:55:18+5:30
डोक्यावर कर्जाचे ओझे, अपुरा पाऊस, दुबार पेरणीचे संकट अशा दुष्टचक्रात सापडलेला शेतकरी आता खतांच्या खरेदीतही नागवल्या जात आहे.

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार
लोकमत विशेष
कृभको आकारतेय वाहतूक खर्च : शेतकऱ्यांवर अतिरिक्त भुर्दंड
कमलेश वानखेडे नागपूर
डोक्यावर कर्जाचे ओझे, अपुरा पाऊस, दुबार पेरणीचे संकट अशा दुष्टचक्रात सापडलेला शेतकरी आता खतांच्या खरेदीतही नागवल्या जात आहे. बी-बियाण्यानंतर आता युरियाचे ब्लॅक मार्केटिंग सुरू झाले आहे. केंद्र सरकारची संस्था असलेल्या कृभकोने (कृषक भारती को-आॅपरेटिव्ह लि.) युुरियाच्या वाहतुकीसाठी सहकारी संस्था व खासगी विक्रेत्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्याने खत विक्रेते शेतकऱ्यांकडून त्याची भरपाई करून घेत आहे. परिणामी शेतकऱ्यांना बॅगमागे ६० ते ७० रुपये जास्त मोजून युरिया खरेदी करावा लागत आहे.
नुकतीच नागपूर रेल्वे स्टेशनवर कृभको कंपनीची २ हजार ५०० टन युरियाची एक रॅक आली. संबंधित युरिया नागपूर जिल्ह्यातील सहकारी संस्था, विदर्भ को आॅप. मार्केटिंग सोसायटी, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ व खासगी खत विक्रेत्यांना विकण्यात आला. खरेदी करण्यात आलेला युरिया एफओआर नुसार (फ्री आॅन रोड) द्यावा, म्हणजे विनाशुल्क खरेदीदाराच्या ठिकाणी पोहचून द्यावा, अशा कृषी आयुक्तांच्या सूचना आहेत. त्यासाठी शासनातर्फे या कंपन्यांना वाहतूक अनुदान दिले जाते. मात्र, कृभकोने खरेदीदारांना एफओआरनुसार युुरिया दिलेला नाही. उलट, युरियाची वाहतूक करण्यासाठी एक विशिष्ट ट्रान्सपोर्टर नेमला असून अतिरिक्त ४०० रुपये देऊन त्या ट्रान्सपोर्टर मार्फतच युरियाची उचल करण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे युरिया खरेदी करणाऱ्या सहकारी संस्था व खासगी खत विक्रेत्यांवर वाहतूक खर्चापोटी ४०० रुपयांचा भुर्दंड पडत आहे.
युरियाच्या ५० किलोच्या एका नीम कोटेड बॅगची किंमत २९८ रुपये व नॉन नीम कोटेड बॅगची किंमत २८४ रुपये आहे. कोणत्याही विक्रेत्याला एमआरपीपेक्षा जास्त दराने युरियाची विक्री करता येत नाही. जास्त दराने विक्री केली तर कारवाई केली जाते. मात्र, कृभकोकडून आकारण्यात येणाऱ्या वाहतूक खर्चामुळे सहकारी संस्था व खासगी विक्रेत्यांनाच युरियाची किंमत एमआरपीपेक्षा जास्त पडत आहे. अशात सहकारी संस्था व खासगी विक्रेते झालेले नुकसान शेतकऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करीत आहेत.
शेतकऱ्यांना युरियाची एक बॅग तब्बल ३४० ते ३५० रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. बिल मात्र एमआरपीचेच दिले जात आहे. काही सहकारी संस्थांनी युुरियाच्या खरेदी बिलासोबत वाहतूक खर्चाची वेगळी पावती देण्यास सुरुवात केली आहे.
लिक्विड फर्टिलायझरची सक्ती
कृभकोने पाच टन युुरियासोबत २० लिटर लिक्विड फर्टिलायझर घेण्याची सक्ती केली आहे. सहकारी संस्था व खासगी विक्रेत्यांना पर्याय नसल्यामुळे त्यांना युरियासोबत लिक्विड फर्टिलायझरही खरेदी करावे लागत आहे. नंतर सहकारी संस्था व खासगी खत विक्रेते शेतकऱ्यांना युुरियासोबत लिक्विड फर्टिलायझर घेण्याची सक्ती करीत आहेत. आधीच संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा सर्वबाजूने नागवल्या जात आहे.
सहकारी संस्था व विक्रेत्यांची कृषी आयुक्तांकडे तक्रार
रेल्वे स्टेशनवरून युरियाची वाहतूक आपण नेमून दिलेल्या ट्रान्सपोर्टरमार्फतच करावी, अशी सक्ती कृभकोने केली असल्यामुळे सहकरी संस्था व विक्रेत्यांनाही यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. यामुळे त्यांनाही शेतकऱ्यांना एमआरपी नुसार युरिया देणे कठीण झाले आहे. कृभकोने लादलेला हा भुर्दंड सहकारी संस्था व खासगी खत विक्रेत्यांना शेतकऱ्यांकडून वसूल करावा लागत आहे. एमआरपीपेक्षा जास्त किंमत घेत असल्यामुळे विक्रेत्यांना शेतकऱ्यांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे. यामुळे काही विक्रेत्यांनी कृभकोकडून आकारण्यात येणाऱ्या वाहतूक शुल्काची कृषी आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.