अस्वस्थ कार्यकर्ते गडकरींना पाहून आनंदित झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:43 IST2018-12-07T21:40:47+5:302018-12-07T21:43:09+5:30
सर्वांच्या मनात एकच प्रश्न, अचानक ‘त्यांच्या’ प्रकृतीला झाले तरी काय ? चेहऱ्यावर चिंता, डोळ्यात प्रतीक्षा अन् मनात काळजी. सुमारे तासाभराची प्रतीक्षा ही त्यांच्यासाठी परीक्षाच घेणारी ठरली. अखेर ‘ते’ आले अन् त्यांना पाहताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून उपस्थितांमधील तणाव दूर झाला अन् आनंद पसरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाने आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्यावर कार्यकर्त्यांची असलेली निष्ठा, प्रेम आणि काळजी अनुभवली.

अस्वस्थ कार्यकर्ते गडकरींना पाहून आनंदित झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वांच्या मनात एकच प्रश्न, अचानक ‘त्यांच्या’ प्रकृतीला झाले तरी काय ? चेहऱ्यावर चिंता, डोळ्यात प्रतीक्षा अन् मनात काळजी. सुमारे तासाभराची प्रतीक्षा ही त्यांच्यासाठी परीक्षाच घेणारी ठरली. अखेर ‘ते’ आले अन् त्यांना पाहताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून उपस्थितांमधील तणाव दूर झाला अन् आनंद पसरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाने आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्यावर कार्यकर्त्यांची असलेली निष्ठा, प्रेम आणि काळजी अनुभवली.
राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नितीन गडकरी यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती कळली अन् कार्यकर्त्यांच्या छातीतच धस्स झाले. ‘आॅल इज वेल’ असल्याचे वृत्त येत असले तरी मनात काळजी कायम होती. आपल्या नेत्याला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांना चैन पडणारच नव्हते. गडकरी दुपारी ३ वाजता नागपूरला येणार अशी माहिती मिळताच अनेक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी विमानतळाकडेच धाव घेतली. गडकरी यांचे विमान यायला विलंब झाला अन् संपूर्ण वेळ उपस्थितांमधील चलबिचल वाढली होती. अखेर दुपारी ४.३० च्या सुमारास गडकरी विमानतळाबाहेर आले. एरवी आपल्या स्वागताला कुणीही विमानतळावर यायचे नाही, अशी सूचना गडकरी यांनी अगोदरपासूनच देऊन ठेवल्या आहेत. मात्र शुक्रवारी काळजीपोटी कार्यकर्ते विमानतळावर भेटायला गेले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.सरोज पांडे, भाजप शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे इत्यादी नेते प्रामुख्याने उपस्थित होते.
आरोग्य तपासणी करणार : गडकरी
कार्यक्रमस्थळी जो मंडप टाकण्यात आला होता त्यात योग्य प्रमाणात हवा येत नसल्यामुळे थोडा त्रास झाला. मात्र आता मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शनिवारी संपूर्ण आरोग्य तपासणी करणार आहे. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या व हित चिंतणाऱ्या सर्वांचे धन्यवाद करतो, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.
अन् गडकरी ‘अॅक्टीव्ह’देखील झाले
प्रकृती खराब झाल्याने गडकरी आता काही दिवस आराम करतील व कुठल्याही कार्यक्रमांना जाणार नाही, असा अंदाज लावण्यात येत होता. मात्र गडकरी शुक्रवारी सायंकाळीच ‘अॅक्टीव्ह’ झाले. खासदार सांस्कृतिक महोत्सवातील ‘तथागत’ महानाट्याला ते जातीने उपस्थित होते. याशिवाय शनिवारीदेखील ते कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून निवासस्थानी येण्याची वेळ दिलेल्या सर्वांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.