अनियंत्रित ट्रकने ५० मेंढ्यांना चिरडले; फरार ट्रकचालकाचा शाेध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2023 19:41 IST2023-07-11T19:41:30+5:302023-07-11T19:41:57+5:30
Nagpur News माैदा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील माैदा शहरानजीकच्या रबडीवाला टी-पाॅइंट परिसरात मंगळवारी (दि. ११) पहाटे ४ वाजताच्या सुमारास वेगात आलेला ट्रक थेट मेंढ्यांच्या कळपात शिरला आणि ५० मेंढ्यांना चिरडत निघून गेला.

अनियंत्रित ट्रकने ५० मेंढ्यांना चिरडले; फरार ट्रकचालकाचा शाेध सुरू
नागपूर : वेगात आलेला ट्रक थेट मेंढ्यांच्या कळपात शिरला आणि ५० मेंढ्यांना चिरडत निघून गेला. त्यामुळे राेडवर रक्त मांसाचा सडा पडला हाेता. यात १५ मेंढ्यांना गंभीर दुखापत झाली, अशी माहिती ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली. ही घटना माैदा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील माैदा शहरानजीकच्या रबडीवाला टी-पाॅइंट परिसरात मंगळवारी (दि. ११) पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.
गोवा रब्बानी (५३, रा. कच्छ, गुजरात) हे त्यांच्या मेंढ्यांसह माैदा परिसरातील परमात्मा एक आश्रमाजवळ काही दिवसांपासून मुक्कामी हाेते. ते मंगळवारी त्यांच्या सर्व मेंढ्या व इतर साहित्य घेऊन चापेगडीच्या दिशेने निघाले हाेते. कळपातील सर्व मेंढ्या राष्ट्रीय महामार्गालगत एकापाठाेपाठ एक जात असतानाच भंडाऱ्याहून नागपूरच्या दिशेने वेगात जाणारा ट्रक त्या कळपात शिरला. त्या ट्रकने कळपातील ५० मेंढ्या चिरडल्या असून, ट्रकच्या धडकेमुळे १५ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. काही मेंढ्या फेकल्या गेल्यानेही जखमी झाल्या.
अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह लगेच घटनास्थळाहून नागपूरच्या दिशेने पळून गेला. या अपघातामुळे राेडवर मेंढ्यांच्या रक्तमांसाचा सडा पडला हाेता. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत मेंढ्यांचे पाेस्टमार्टम व जखमी मेंढ्यांवर उपचार केले. यात आपले किमान पाच लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती मेंढ्यांचे मालक गाेवा रब्बानी यांनी दिली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.