Unrest in BSP at Nagpur, burnt effigies of leaders | नागपुरात बसपामध्ये असंतोष, जाळले नेत्यांचे पुतळे

नागपुरात बसपामध्ये असंतोष, जाळले नेत्यांचे पुतळे

ठळक मुद्देराष्ट्रीय महासचिव वीरसिंह, संदीप ताजने यांच्याविरोधात संताप : प्रादेशिक पक्ष कार्यालयासमोर आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र विधानसभेतील निवडणुकांनंतर परत एकदा बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश नेतृत्वात बदल झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. आतापर्यंत केवळ पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. परंतु मंगळवारी नागपुरातील नारी रोड स्थित प्रादेशिक कार्यालयासमोर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड.वीरसिंह व नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.संदीप ताजने यांच्या विरोधात नारेबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळेदेखील जाळले.
वीरसिंह यांच्यासारख्या नेत्यांनी महाराष्ट्रात पक्षाचा सौदा करण्याचे काम केल्याचा संतप्त कार्यकर्त्यांचा आरोप होता. वीरसिंह यांना राज्यातील जे पदाधिकारी मदत करतात त्यांना पक्षात मोठे पद दिले जाते. यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाचा जनाधार कमी होत आहे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात पक्षाचे नुकसान होत आहे असे नेता नको हे आम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांना विरोध प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगायचे आहे. दुसऱ्या नेत्यांना राज्याची जबाबदारी दिली तर ती आनंदाने स्वीकारु व नि:स्वार्थपणे पक्षाचे काम करु, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी दोन्ही नेत्यांविरोधात निदर्शने करण्यात आली.

Web Title: Unrest in BSP at Nagpur, burnt effigies of leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.