जन्मदात्याच्या दुष्कृत्याची शिक्षा भोगतोय निरपराध कुणाल
By Admin | Updated: July 2, 2014 00:50 IST2014-07-02T00:50:48+5:302014-07-02T00:50:48+5:30
जन्मदात्याचे चांगले कर्तृत्व मुलांना सुसंस्कारित करते. मात्र त्यांनी आयुष्यात कुठलेही दुष्कर्म केल्यास मुलांनाही त्याची फळे भोगावी लागतात. एका पित्याने असेच दुष्कर्म केले आणि त्याची फळे मात्र

जन्मदात्याच्या दुष्कृत्याची शिक्षा भोगतोय निरपराध कुणाल
नातेवाईकांनीही नाकारले : आता आधार बालसुधारगृहाचा
मोहन राऊत - अमरावती
जन्मदात्याचे चांगले कर्तृत्व मुलांना सुसंस्कारित करते. मात्र त्यांनी आयुष्यात कुठलेही दुष्कर्म केल्यास मुलांनाही त्याची फळे भोगावी लागतात. एका पित्याने असेच दुष्कर्म केले आणि त्याची फळे मात्र त्याच्या अवघ्या १३ वर्षांच्या मुलाला भोगावी लागत आहेत. पन्नास हजारांसाठी नागपुरातील चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याचा १३ वर्षीय मुलगा कुणालला (काल्पनिक नाव) नातेवाईकांनी नाकारले आहे. निरपराध कुणाल आईवडिलांच्या कृत्याची शिक्षा भोगतो आहे़
नागपूरच्या कैलासनगरातील मनोज वैरागडे यांची आठ महिन्यांची चिमुकली ‘परी’ हिचे नागपुरातून गुरुवारी अपहरण करण्यात आले. अपहरणकर्ता अतुल व त्याची पत्नी विशाखा काटे हे मुलगा कुणाल व अपहृत परी या मुलीला घेऊन भटकत होते. दरम्यान परीच्या पित्याला फोन करुन काटे दाम्पत्याने पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली होती. हे सर्व रविवारी गोंडवाना एक्स्पे्रसने नागपुरकडे जात असल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धामणगाव रेल्वे स्थानकावर पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. धामणगाव रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण पुलगाव रेल्वे पोलीस व तेथून नागपूर रेल्वे पोलिसांकडे वळते केले.
त्यानंतर अजनी पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. अपहृत परीला तिच्या आई-वडिलांच्या सुपुर्द केले. न्यायालयाने आरोपी काटे दाम्पत्याला पोलीस कोठडी सुनावली. परंतु त्यांचा १३ वर्षीय मुलगा कुणालचा प्रश्न उपस्थित झाला. जन्मदात्यांच्या अपराधामुळे कुणालला स्वीकारण्यास नातेवाईकांनी नकार दिला. त्यामुळे कुणालची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
सोळा वर्षांपूर्वी अतुल व विशाखाचा आंतरजातीय विवाह झाला. दोन्ही कुटुंबांनी या दोघांना आपल्या घराची पायरी चढू दिली नाही़ भाड्याच्या खोलीत संसार करताना राहताना आयुष्याचा कंटाळा आला पण ज्या मुलाला आपण जन्म दिला त्याचे काय होणार अशी चिंता या दाम्पत्याला सतावत होती. मागील पाच ते सहा वर्षांपासून हे जोडपे मिरज रेल्वे स्थानकावर पोळ्या लाटण्याचे काम करीत होते. इयत्ता आठवीपासून कुणालला नागपुरात शिकवायचे असा त्यांनी ठाम विचार केला. परंतु शहरात आल्यानंतर पाचवीला पुजलेली पैशाची चणचण होतीच. अनेकांची दारे ठोठावली, मित्रांना मदत मागितली परंतु कोणीच मदतीचा हात पुढे केला नाही. त्यामुळे त्यांनी मनोज वैरागडे या मित्राच्या मुलीच्या अपहरणाचा हा मार्ग पत्करला.
अपहरण करणाऱ्या या जोडप्या विरूध्द नागपूर पोलिसांनी अपहरण व खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला. येथील अतिरिक्त मुख्य न्यायालयाचे न्यायाधीश बोलाणी यांनी ४ जुलै पर्यंत या जोडप्याला पोलीस कोठडी सुनावली़ नागपूर पोलिसांनी माणुसकीचा आधार घेत सर्व नातेवाईकांसोबत कुणालला नेण्यासाठी संपर्क साधला. परंतु एकही नातेवाईक निरपराध कुणालला आपल्या घरी न्यायला तयार झाला नाही. त्यामुळे अखेर नागपूर येथील रिमांड होममध्ये त्याची रवानगी करण्यात आली़ तू कोणत्या गुन्ह्यात आलास? असे त्याला येथील मुले विचारतात तेव्हा कुणाल नि:शब्द होतो़ आपल्या जन्मदात्याच्या दुष्कर्मामुळे निष्पाप कुणाल आठव्या वर्गात प्रवेश घेण्याऐवजी रिमांड होममध्ये राहण्याची शिक्षा भोगतो आहे़