विद्यापीठाला ‘बजाज पॉवर’

By Admin | Updated: July 8, 2014 01:26 IST2014-07-08T01:26:51+5:302014-07-08T01:26:51+5:30

महात्मा गांधी म्हणजे सामाजिक समरसतेचे मूर्तिमंत प्रतीक. बापूंच्या संस्कारांचा नंदादीप आजही कोट्यवधी भारतीयांच्या मनात तेवत आहे. गांधीजींना सेवाग्राम येथे आश्रम उघडण्यासाठी आग्रह

University's 'Bajaj Power' | विद्यापीठाला ‘बजाज पॉवर’

विद्यापीठाला ‘बजाज पॉवर’

१० कोटींची देणगी : व्यवस्थापन परिषदेने केले स्वागत
नागपूर : महात्मा गांधी म्हणजे सामाजिक समरसतेचे मूर्तिमंत प्रतीक. बापूंच्या संस्कारांचा नंदादीप आजही कोट्यवधी भारतीयांच्या मनात तेवत आहे. गांधीजींना सेवाग्राम येथे आश्रम उघडण्यासाठी आग्रह करणारे व्यक्तिमत्त्व होते जमनालालजी बजाज. या दोघांची प्रेरणा समोर ठेवून प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी शिक्षणक्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचा संकल्प घेतला आहे. निरनिराळ्या कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या प्रशासनाला नवीन ‘पॉवर’ देण्याचे काम त्यांनी केले असून, ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी)अंतर्गत विद्यापीठाला १० कोटी रुपयांचा निधी ते उपलब्ध करून देणार आहेत. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विशेष म्हणजे विद्यापीठाला ‘सीएसआर’अंतर्गत मिळालेले हे सर्वात मोठे योगदान आहे.
सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत बजाज आॅटो लिमिटेडच्या माध्यमातून पाठविलेला या आशयाच्या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली व बजाज यांच्याकरिता अभिनंदन ठरावदेखील संमत केला.
कंपनी कायदा २०१३ अनुसार एखाद्या कंपनीचे निव्वळ मूल्य ५०० कोटी रुपयांहून अधिक असेल किंवा कंपनीची उलाढाल एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास तसेच कंपनीला पाच कोटींहून अधिक निव्वळ नफा झाल्यास त्यांना २ टक्के रक्कम ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी’(सीएसआर)अंतर्गत सामाजिक उपक्रमांसाठी देणे बंधनकारक असते. ‘सीएसआर’साठी राहुल बजाज यांनी ज्या विद्यापीठात महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेले सेवाग्राम येथे व ज्या वर्धा, नागपुरच्या भूमीत जमनालाल बजाज यांनी वास्तव्य केले तेथील विद्यापीठाची निवड केली. त्यानुसार बजाज उद्योग समूहाचे कार्यपालन अधिकारी संजय भार्गव यांनी रातुम नागपूर विद्यापीठाला २८ मे रोजी ई-मेल पाठवून इमारत बांधकामासाठी १० कोटी रुपये देण्याची बजाज कंपनीची इच्छा असल्याचे कळवले होते. ‘सीएसआर’अंतर्गत हा निधी दिला जाणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले होते. (प्रतिनिधी)
जमनालाल बजाज प्रशासकीय परिसर
बजाज कंपनीकडून ‘सीएसआर’अंतर्गत येऊ घातलेल्या या निधीच्या माध्यमातून नागपूर विद्यापीठ नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणार आहे. विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील ४४ एकर मोकळ्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारत प्रस्तावित असून, इमारतीचे बांधकाम वर्षभरात पूर्ण होणार आहे. यासाठी एकूण २२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या इमारतीचा आराखडा तयार करण्याचे काम एका खासगी संस्थेकडे सोपवण्यात आले असून, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने एक कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केल्याची माहिती अनुपकुमार यांनी दिली. या नवीन प्रशासकीय परिसराचे नाव जमनालाल बजाज प्रशासकीय परिसर असे करण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. जमनालाल बजाज यांचे वर्धा हे स्वग्राम होते. विद्यापीठाशी संलग्नित असलेली चार महाविद्यालये व बजाज फाऊंडेशन ही संस्थादेखील वर्धा येथीलच आहे. जमनालाल बजाज यांनी एप्रिल १९३० मध्ये दांडीयात्रेनंतर महात्मा गांधी यांना सेवाग्राम येथे आश्रम उभारण्यासाठी आग्रह केला व जागादेखील उपलब्ध करून दिली होती.

Web Title: University's 'Bajaj Power'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.