अभियांत्रिकीच्या परीक्षेत विद्यापीठ पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:09 IST2021-03-28T04:09:10+5:302021-03-28T04:09:10+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी शनिवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. आज अभियांत्रिकी, बीएस्सी व बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या परीक्षा ...

अभियांत्रिकीच्या परीक्षेत विद्यापीठ पास
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी शनिवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. आज अभियांत्रिकी, बीएस्सी व बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या परीक्षा अडचणीविना पार पडल्या. २०२० च्या हिवाळी परीक्षेच्या तिसऱ्या दिवशी ३५ हजार २७१ पैकी ३३ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली. यामधून ३१ हजार १४८ म्हणजे ९८.५८ टक्के विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका जमा केल्या.
उल्लेखनीय म्हणजे जुना अनुभव बघता विद्यापीठाचा परीक्षा विभाग परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी तणावात हाेता. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला हाेता. त्यामुळे पहिल्या दिवशीची परीक्षा रद्द करावी लागली. माहितीनुसार परीक्षेच्या वेळी अडचणी येऊ नये म्हणून ऑनलाईन परीक्षेत विद्यापीठाची मदत करणाऱ्या प्राेमार्क कंपनीच्या टेक्निकल टीमला बाेलावण्यात आले हाेते. परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी व परीक्षेच्या वेळी सातत्याने सर्व्हरवर लक्ष ठेवण्यात आले. साेबतच हेल्पलाईन क्रमांकालाही सक्रिय ठेवण्यात आले हाेते, जेणेकरून काेणत्याही विद्यार्थ्याला अडचण आली तर तत्काळ दुरुस्त करता येईल.
सूत्रानुसार ९७ टक्के विद्यार्थ्यांनी माेबाईलवरच प्रश्नपत्रिका साेडविली. काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या, पण त्यांना तत्काळ दूर करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे साेपे गेले. विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ वाजताच्या सत्रात १६ हजार ८५४ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधून १५ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका जमा केली. दुसरे सत्र सकाळी ११.३० वाजता सुरू करण्यात आले. यामध्ये १४,६६० पैकी १४,२२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व सर्वांनी यशस्वीपणे सबमीटही केले. तिसऱ्या सत्रात ३,७५५ पैकी ३,४७४ विद्यार्थी सहभागी झाले. ३,४४५ विद्यार्थ्यांनी सबमीट केले.
पुनर्परीक्षेवर हाेणार विचार
याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले, परीक्षा आणखी अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. काही विद्यार्थी परीक्षा का देऊ शकले नाही, यावर विचार हाेईल. साेबतच डेटाचे विश्लेषण करून ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांची परीक्षा पुन्हा घेण्याबाबत विचार करण्यात येईल.