विद्यापीठात ‘मॉडर्न’ वसतिगृह?

By Admin | Updated: August 19, 2014 01:00 IST2014-08-19T01:00:17+5:302014-08-19T01:00:17+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परंतु विद्यार्थ्यांची ही अडचण लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत.

University 'Modern' hostel? | विद्यापीठात ‘मॉडर्न’ वसतिगृह?

विद्यापीठात ‘मॉडर्न’ वसतिगृह?

प्रतीक्षा संपणार : आज मोठे निर्णय होण्याची शक्यता
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परंतु विद्यार्थ्यांची ही अडचण लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. ‘लॉ कॉलेज’ चौकातील विद्यापीठ वसतिगृहाच्या जागेवर अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे ‘मॉडर्न’ वसतिगृह तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये यासंदर्भात ठराव ठेवला जाणार आहे.
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. के.सी. देशमुख यांनी यासंदर्भात ठराव सादर केला आहे. विद्यापीठ वसतिगृृहाची अवस्था अतिशय जीर्ण झाली आहे.
अस्वच्छ स्वच्छतागृहे, खानावळीची वाईट अवस्था अशा अवस्थेत विद्यार्थ्यांना नाईलाजाने राहावे लागत आहे. त्यामुळे या वसतिगृहाच्या ठिकाणी नवीन बहुमजली ‘मॉडर्न’ वसतिगृहाची निर्मिती करावी. याकरिता विद्यापीठ अनुदान आयोगासोबतच इतरही वित्तीय संस्थांची मदत घेण्यात यावी, अशा आशयाचा हा ठराव आहे. कार्यक्रम पत्रिकेनुसार या ठरावाला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विचारासाठी ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
विभागप्रमुखांना ‘एसी’, विद्यार्थ्यांचे काय?
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक विभागांच्या प्रमुखांच्या कक्षात वातानुकूलित यंत्र स्थापन करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. २३ मे रोजी विभागप्रमुखांनी सादर केलेल्या निवेदनानुसार कुलगुरूंनी २७ वातानुकूलित यंत्र लावण्यासंबंधी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. परंतु यासंदर्भात धोरणात्मक निर्णय न झाल्याने अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली नाही. २७ वातानुकूलित यंत्रांसाठी १३ लाख ३० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. यावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. परंतु विद्यापीठातील काही विभागांत अगोदरपासूनच वातानुकूलित यंत्र लागलेले आहेत. अशास्थितीत कोणत्याही विभागप्रमुखांच्या कक्षात वातानुकूलित यंत्र प्रस्तावित करण्यात आले नव्हते असे संबंधित बाबीमध्ये नमूद कसे काय करण्यात आले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे अनेक शैक्षणिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांना अस्वच्छतेत बसावे लागत आहे. काही ठिकाणी स्वच्छतागृहे अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत. ‘वाय-फाय’ची विद्यार्थ्यांना अद्याप प्रतीक्षा आहे. अशास्थितीत विभागप्रमुखांच्या सोयींसोबतच विद्यार्थ्यांच्या समस्यांवर धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

Web Title: University 'Modern' hostel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.