विद्यापीठ करणार उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान
By Admin | Updated: September 3, 2014 01:17 IST2014-09-03T01:17:49+5:302014-09-03T01:17:49+5:30
शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिक्षक कल्याण निधीअंतर्गत उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी विद्यापीठाच्या सात

विद्यापीठ करणार उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान
नागपूर : शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिक्षक कल्याण निधीअंतर्गत उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी विद्यापीठाच्या सात शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दीक्षांत सभागृहात शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉ. अर्चना नेरकर यांनी दिली.
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. शुभा जोहरी, सांख्यिकीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. माणिक खापर्डे, धनवटे नॅशनल कॉलेजचे डॉ. रत्नाकर भेलकर, एम.पी.देव स्मृती धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे डॉ.एन.एल.खोब्रागडे
यांची निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट संशोधक पुरस्कार विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अरुण जाधव यांना देण्यात येणार आहे. तर सामाजिक कार्यात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणारा सामाजिक कार्य उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार शासकीय वसंतराव नाईक संस्थेचे डॉ. भाऊ दायदार यांना देण्यात येणार आहे. भंडारा येथील आर. एम. पटेल महाविद्यालयाच्या डॉ. जुल्फी शेख यांना उत्कृष्ट लेखक पुरस्कार देण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर व अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार अध्यक्षस्थान भूषवतील. या कार्यक्रमाला सर्व संलग्नीत महाविद्यालये व शैक्षणिक विभागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
उत्कृष्ट संशोधक पुरस्कारासाठी चार अर्ज
विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांसाठी पात्र शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यंदा विद्यापीठाला एकूण ३९ अर्ज प्राप्त झाले. मागील वर्षी हीच संख्या २५ इतकी होती. यातील बहुतांश अर्ज हे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी होते. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालये असतानादेखील उत्कृष्ट संशोधक पुरस्कारासाठी केवळ चार अर्ज आले.