ज्ञानरचनेचा सिद्धांत मांडणारी काव्यक्रांती एकतेची
By Admin | Updated: August 11, 2014 00:54 IST2014-08-11T00:54:26+5:302014-08-11T00:54:26+5:30
विषमतेची भिंत तोडून, परंपरेच्या सीमा ओलांडनू, जातीयतेची चौकट नष्ट करून, वैचारिक क्रांतीचा परीघ विस्तारित करणारी, ज्ञानरचनेचा सिद्धांत मांडणारी, काव्यक्रांती एकतेची असावी,

ज्ञानरचनेचा सिद्धांत मांडणारी काव्यक्रांती एकतेची
सम्यक साहित्य मंच : क्रांतिदिनाला काव्याभिवादन
नागपूर : विषमतेची भिंत तोडून, परंपरेच्या सीमा ओलांडनू, जातीयतेची चौकट नष्ट करून, वैचारिक क्रांतीचा परीघ विस्तारित करणारी, ज्ञानरचनेचा सिद्धांत मांडणारी, काव्यक्रांती एकतेची असावी, असे विधान आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले.
सम्यक साहित्य मंचच्यावतीने क्रांतिदिनानिमित्त शनिवारी ‘काव्यक्रांती एकतेची’ या विषयावर चर्चा आणि कविता सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रूपाताई कुळकर्णी, डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश खरात उपस्थित होते.
डॉ. मनोहर म्हणाले, या मंचमुळे काव्यसागराचे किनारे विस्तारित झाले आहेत. कवींसोबत सामाजिक बांधिलकी जोपासणारे श्रोतेही संघटित होत आहेत. डॉ. कुळकर्णी म्हणाल्या, या कार्यक्रमात कवींनी सामाजिक विसंगतीच्या विकृतींवर प्रकाश टाकला आहे. माणसामाणसात भेद करणाऱ्या संस्कृतीबद्दल निषेधाचा सूर मांडला, तर काहींनी सकारात्मकही बाजू मांडली आहे. यामुळे या मंचावर ‘काव्यक्रांती’ घडून आली आहे.
डॉ. खरात म्हणाले, माणसाला केंद्रस्थानी ठेवून आंबेडकरी चळवळीला तेवढ्याच ताकदीने पुढे नेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात सहभागी कवींनी आपल्या कवितेतून केला आहे. संचालन कथालेखिका डॉ. मंजूषा सावरकर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ कवी भाऊ पंचभाई, नीलकांत ढोले, इ.मो. नारनवरे, अमर रामटेके, हृदय चक्रधर, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, मनीषा साधू, हेमलता ढवळे, प्राजक्ता खांडेकर, ज्ञानेश्वर वांढरे, प्रकाश दुलेवाले, प्रसेनजित ताकसांडे, संजय गोडघाटे, मधुकर कडू यांनी एकापेक्षा एक सरस रचना सादर करून क्रांतिदिनाला काव्याभिवादन केले.
प्रास्ताविक सम्यक साहित्य मंचचे अध्यक्ष प्रा. हृदय चक्रधर यांनी केले तर आभार प्रकाश दुलेवाले यांनी मानले.(प्रतिनिधी)