बेरोजगार कंत्राटदारांचे गडकरींना साकडे
By Admin | Updated: May 7, 2017 02:18 IST2017-05-07T02:18:27+5:302017-05-07T02:18:27+5:30
राज्य सरकारने कंत्राटदारांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कंत्राटदाराची आर्थिक क्षमता

बेरोजगार कंत्राटदारांचे गडकरींना साकडे
नोंदणी रद्द करू नका : शासनाचा आदेश रद्द करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने कंत्राटदारांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कंत्राटदाराची आर्थिक क्षमता व कामे करण्याचा अनुभव या आधारावर कामे दिली जाणार आहेत. या निर्णयामुळे स्थानिक सुशिक्षित कंत्राटदारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. याची दखल घेत संबंधित शासन निर्णय रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन केली.
संबंधित अन्यायकारक निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने गुरुवारी संविधान चौकात निदर्शने केली होती. त्यानंतर शिष्टमंडळाने गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागात सुरुवातीपासून विविध स्तरावर ई-निविदा प्रणालीद्वारे नोंदणीकृत कंत्राटदारांकडून निविदा मागवून कमी दराच्या निविदाधारकास कामे दिली जात होती. ही प्रणाली सार्वजनिक बांधकाम विभाग, नोंदणीकृत कंत्राटदार या दोघांसाठी सोपी होती. या विभागाची नोंदणी ही इतर विभागात ग्राह्य मानली जात होती. मात्र, शासनाने कंत्राटदारांची नोंदणी रद्द करून त्यांना आर्थिक क्षमता आणि अनुभवाच्या आधारावर कामे देण्याचा निर्णय घेतला. यामुळे नोंदणीकृत कंत्राटदारावर अन्याय होत आहे. विनानोंदणी कामे मिळणे सुरू झाल्यास महाराष्ट्राबाहेरील कंत्राटदारांचा लोंढा महाराष्ट्रात येईल. यामुळे स्थानिक कंत्राटदार बेरोजगार होतील. तसे झाले तर शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदारावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल. त्यामुळे संबंधित आदेश रद्द करावा, अशी मागणी असोसिएशनचे प्रताप रणनवरे, सुबोध सरोदे, संजय मैंद, अरुण ठाकरे, भूपेंद्र चरडे, रवी चव्हाण, रूपेश रणदिवे, संजीव कपूर, राजेश नबिरा, प्रदीप नगराळे, अनिल धापसे, अतुल कलोती, कौशिक देशमुख, दिलीप बाराहात आदींनी गडकरी यांच्याकडे केली.
गडकरींनी साधला चंद्रकांत पाटलांशी संवाद
कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर गडकरी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधला. कंत्राटदारांची भूमिका व त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाची माहिती दिली. तसेच कंत्राटदारांच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन यातून मार्ग काढण्याची सूचनाही गडकरी यांनी पाटील यांना केली.