हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:16+5:302021-01-03T04:11:16+5:30
खर्च कमी करण्यासाठी लांबी केली कमी : निधीची मात्र प्रतीक्षाच रामटेक. रामटेक विधानसभा क्षेत्रातील हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत मंजूर रस्त्याचे ...

हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत
खर्च कमी करण्यासाठी लांबी केली कमी : निधीची मात्र प्रतीक्षाच
रामटेक. रामटेक विधानसभा क्षेत्रातील हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत मंजूर रस्त्याचे डांबरीकरण ऐवजी सिमेंट रोडचा सुधारित प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मात्र रस्त्याची लांबी कमी करून शासनावर अतिरिक्त दायित्व न देता पूर्ण करण्याचे ठरले आहे. यासाठी लागणाऱ्या निधीची मात्र प्रतीक्षाच आहे. रामटेक विधानसभा क्षेत्रात रस्त्याची समस्या मोठी आहे. त्यामुळे रामटेकचा विकास गतीने होऊ शकला नाही. कन्हान-तारसा-अरोली (रा.मा.-३४५), अरोली-भंडारबोडी- गुगुलडोह रस्ता ( प्रा.जि.मा.- २० ) एकूण लांबी ४१.३५ किमी. या कामाचा प्रस्तावित खर्च १२५.८७ लाख रुपये आहे. यामध्ये ११.२४ कि.मी.ची घट केली आहे. दुसरा रस्ता कांद्री-बोरडा-निमखेडा-नगरधन (प्राजिमा २१अ), रामटेक-मुसेवाडी-हिवराबाजार-बेलदा-नवेगाव ( प्रा.जि.मा.-१९) या रस्त्याची लांबी ४७.०५ किमी आहे. या कामाचा प्रस्तावित खर्च १३०.३५ लाख रुपये असून ८.९० कि.मी.ची लांबी कमी केली आहे. तिसरा रस्ता तामसवाडी-ईटगाव-खंडाळा-दहेगाव रस्ता (प्रा.जि.मा.-१४), दहेगाव-करंभाड (इजिमा १५), करंभाड-भागेमाहारी- कालभैरव परसोडी रस्ता (प्राजिमा १५), परसोडी-पालासावळी-कोंडासावली रस्ता यांची एकूण लांबी ३९.२२० कि.मी. आहे. याचा प्रस्तावित खर्च ११५.४० लाख रुपये आहे. यात ८.२२ कि.मी. लांबी कमी केली आहे. या तीनही रस्त्यांचा एकूण खर्च ३७१.०१ लाख असणार आहे. हायब्रीड ॲन्युईटीच्या संपूर्ण कामात ७ मी. लांबी व ५.५० मी. रुंदी मध्ये काँक्रिटीकरण व वनविभागाच्या लांबीमध्ये डांबरीकरण केल्यास प्रशासकीय मान्यतेच्यावर खर्च अपेक्षित आहे. याबाबत तत्कालीन आ. डी.एम.रेड्डी यांनी कुठलाही खर्च न वाढविता काँक्रिट रस्ते करा व कामाची लांबी कमी केल्यास शासनाला जास्तीचा भार पडणार नाही, अशी मागणी केली होती.त्यानुसार शासनाने हा नवीन प्रस्ताव मंजूर केला आहे. पण पूर्ण लांबीचे रस्ते झाले नाहीत तर त्या रस्त्याचा उपयोग काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शासनाने ३३ टक्के निधी देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या तीन रस्त्यांसाठी लागणारा ३७१ लाख रुपयांचा निधी केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा आहे.