डबल एम.ए. नंतर 'ती' करते चोऱ्यांमध्ये ‘पीएच.डी.’; डोळ्यांची पापणी लवताच दाखविते कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 07:00 IST2022-01-04T07:00:00+5:302022-01-04T07:00:06+5:30

Nagpur News नागपुरात गेल्या काही वर्षांपासून धूम मचविणारी आणि पोलिसांना परेशान करून सोडणारी ही चोरटी काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या हाती लागली अन् तिचा बेमालूमपणा पाहून पोलीसही काही वेळेसाठी चक्रावले.

Unconsciously, a highly educated young woman caught in a police trap | डबल एम.ए. नंतर 'ती' करते चोऱ्यांमध्ये ‘पीएच.डी.’; डोळ्यांची पापणी लवताच दाखविते कमाल

डबल एम.ए. नंतर 'ती' करते चोऱ्यांमध्ये ‘पीएच.डी.’; डोळ्यांची पापणी लवताच दाखविते कमाल

ठळक मुद्देउच्चशिक्षित चोरट्या तरुणीची धमाल

नरेश डोंगरे

नागपूर : डोळ्यांत डोळे टाकून ती तुमच्या शेजारी येते. तुमच्या डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच ती कमाल दाखविते. रोख अन् माैल्यवान दागिने घेऊन ती तुमच्या डोळ्यांदेखत निघूनही जाते.

नागपुरात गेल्या काही वर्षांपासून धूम मचविणारी आणि पोलिसांना हैराण करून सोडणाऱ्या या तरुणीला अखेर पोलिसांनी पकडले. त्यांनी चाैकशीत तिच्याकडून चोरीचे प्रात्यक्षिक करून घेतले अन् तिची हातसफाई पाहून पोलीसही काही वेळेसाठी चक्रावले.

नागपूर जिल्ह्यात राहणारी ही तरुणी अवघी २७ वर्षांची आहे. घरची आर्थिक स्थिती सधन आहे. ती डब्बल एम.ए. झालेली. काही वर्षांपूर्वी तिला चोरीची सवय लागली अन् तिने नागपुरात धूम मचविणे सुरू केले. गर्दीच्या ठिकाणी जाऊन महिलेच्या पर्समधून रोख, दागिने लंपास करण्याचा तिने सपाटाच लावला. एकाच प्रकारचे गुन्हे वारंवार घडत असल्याने पोलीसही हैराण झाले होते.

ही चोरी ती एवढ्या सराईतपणे करते की, संबंधित महिलेला चोरी झाल्याची बराच वेळ कल्पनाच येत नाही. तिने अशा प्रकारे तब्बल २० चोऱ्या केल्या आहेत.

कानपूरचा गुरुमंत्र

होस्टेलमध्ये राहणाऱ्या एका उच्चभ्रू तरुणीने तिला आठ वर्षांपूर्वी चोरीचा गुरुमंत्र शिकविला होता. काही महिने तिच्यासोबत चोरी केल्यानंतर हिस्सेवाटणीवरून त्या दोघीत वाद झाला अन् हिने नंतर स्वतंत्र दुकानदारी सुरू केली.

नुसतीच शानशाैकिन

इंग्रजी, मराठीसह तीन-चार भाषांवर प्रभुत्व असलेली ही ‘उच्चशिक्षित चोरणी’ मौजमजेसाठी चोरी करते. पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा १९ चोऱ्यांमधील संपूर्ण रक्कम तिने शानशाैकात उडविली. मात्र, चोरीचे सुमारे २० लाखांचे दागिने तिने घरात ‘जैसे थे’च ठेवले होते. दागिने विकायला गेल्यास सराफ अनेक प्रश्न विचारेल अन् आपले बिंग फुटेल, अशी तिला भीती वाटायची. त्यामुळे ती दागिने एका डब्यात भरून ठेवत होती.

ये आप नही समझोंगे ...।

सीताबर्डी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तिला पकडले तेव्हा तिला चोरी करण्याचे व्यसन जडल्याचे तपासांतून उघड झाले. उच्चशिक्षित आहे, चांगल्या घरची आहे, मग कशाला चोऱ्या करते, असा प्रश्न तिला पोलिसांनी केला, तेव्हा तिने ‘आप ये नही समझोंगे’ असे धीरगंभीर उत्तर दिले. या क्षेत्रात बरेच पुढे जायची तिची महत्त्वाकांक्षा आहे. ती ‘चोरणी’ असल्याचे लक्षात आल्याने तिचे जुळलेले लग्नही यापूर्वी तुटले, हे विशेष ।

 

Web Title: Unconsciously, a highly educated young woman caught in a police trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.