अनधिकृत वीज वापर भोवला ! 'कोर्ट उठेपर्यंत' कोठडीची शिक्षा आणि १० हजारांचा दंड
By आनंद डेकाटे | Updated: December 18, 2025 15:16 IST2025-12-18T15:11:35+5:302025-12-18T15:16:56+5:30
Nagpur : विजेचा अनधिकृत वापर करणे एका महिलेला महागात पडले आहे. नागपूरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने याप्रकरणी संबंधित महिलेला दोषी ठरवत १० हजारांचा दंड आणि 'न्यायालय सुटेपर्यंत' कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Unauthorized electricity usage caught! Custody sentence 'till court' and fine of Rs 10,000
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विजेचा अनधिकृत वापर करणे एका महिलेला महागात पडले आहे. नागपूरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने याप्रकरणी संबंधित महिलेला दोषी ठरवत १० हजारांचा दंड आणि 'न्यायालय सुटेपर्यंत' कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महिनाभरात सलग दुसऱ्यांदा न्यायालयाने विजेचा अनधिकृत वापर करणाऱ्या ग्राहकाला अशाप्रकारची शिक्षा सुनावली आहे.
तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भानखेडा, येथे राहणाऱ्या ग्राहकाच्या घरी २७ सप्टेंबर २०२१ रोजी महावितरणच्या पथकाने छापा टाकला होता. महावितरणचे सहाय्यक अभियंता शाहरुख मेहमूद्दीन तुराक यांनी केलेल्या तपासणीत असे आढळले की, आरोपी महिलेने वीज खांबावरून अनधिकृतपणे वीज जोडणी घेतली होती. घरगुती वापरासाठी विजेची चोरी आणि मीटरमध्ये फेरफार केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा, २००३ च्या कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान आरोपी महिलेने स्वतःहून आपला गुन्हा कबूल केला. आपण घरातील एकमेव कमावती व्यक्ती असून उदरनिर्वाहासाठी छोटा घरगुती व्यवसाय चालवत असल्याचे सांगत तिने न्यायालयाकडे दयेची मागणी केली होती.
न्यायाधीशांनी आरोपीची परिस्थिती आणि तिने प्रथमच केलेला गुन्हा लक्षात घेता, तिला कारावासाऐवजी दंडात्मक शिक्षा देणे योग्य मानले. यानुसार न्यायालयाने न्यायालय सुटेपर्यंत कोठडीत बसण्याची शिक्षा. महावितरणला नुकसान भरपाई म्हणून देण्यासाठी दहा हजाराचा दंड आणि भविष्यात अशा गुन्ह्याची पुनरावृत्ती न करण्याची ताकीद दिली आहे. अनधिकृत वीज वापर हा गंभीर गुन्हा असला तरी, आरोपीने तपासात सहकार्य केल्याने न्यायालयाने तिला दंड भरण्याची संधी देऊन प्रकरणाचा निकाल लावला.
अनधिकृत वीज वापरणा-याला न्यायालयाचा महिनाभरात दुसरा शॉक
तीन आठवड्यापुर्वी जिल्हा न्यायाधीश-३ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी विशेष प्रकरणामध्ये अनधिकृत वीज वापरणाऱ्या ग्राहकाला दोषी ठरवून 'न्यायालयीन कामकाजाच्या समाप्तीपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला होता.