उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य विस्थापितांचे तीन गावांमध्ये होणार पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 21:46 IST2019-08-07T21:44:17+5:302019-08-07T21:46:04+5:30
उमरेड-पवनी-कऱ्हांडला या वाढीव अभयारण्याच्या विस्तारासाठी आणि त्यामुळे करावयाच्या पुनर्वसनाच्या विषयावर वन रात्र्यमंत्री परिणय फुके यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक घेतली. यात काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये या विस्थापितांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य विस्थापितांचे तीन गावांमध्ये होणार पुनर्वसन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला या वाढीव अभयारण्याच्या विस्तारासाठी आणि त्यामुळे करावयाच्या पुनर्वसनाच्या विषयावर वन रात्र्यमंत्री परिणय फुके यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक घेतली. यात काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये या विस्थापितांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने आवश्यक ती तांत्रिक पूर्तता करण्याचे निर्देशही राज्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
उमरेड-पवनी-कऱ्हांडला वाढीव अभयारण्य क्षेत्रासंदर्भात झालेल्या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते आणि वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत डॉ. परिणय फुके म्हणाले, उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या सभोवताल अरण्य परिसर वाढत आहे. त्यामुळे या परिसरात अभयारण्याचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. या अभयारण्याचा विस्तार होणार असल्याने, या परिसरातील गावात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. यासाठी काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरित करता येईल, अशी सूचना त्यांनी केली. उमरेड, पवनी येथील साधारण ६०५ कुटुंबांचे पुनर्वसन २९५ हेक्टर जमिनीवर करता येणार आहे.
पुनर्वसन केल्या जाणाऱ्या गावकऱ्यांना नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल, असे डॉ. फुके यांनी यावेळी सांगितले. मात्र ही नुकसान भरपाई नेमकी कोणत्या प्रकारची असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात क्षेत्र अधिसूचित केल्यावर नुकसान भरपाई दिली जाणार आहे. गावात राहणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अभयारण्य क्षेत्र अधिसुचित करून व कक्षा वाढवून नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल, असे संकेतही त्यांनी या बैठकीत दिले आहेत.
पुनर्वसन उपविभागीय अधिकारी नेमणार
या गावकऱ्यांचे स्थलांतर करण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
पुनर्वसनासंदर्भातील कारवाई केली जात असताना उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांना स्थलांतराबाबत अधिसूचना उपविभागीय अधिकाऱ्यांनी द्याव्यात, असे बैठकीत ठरले.