प्राध्यापकांना अल्टिमेटम!
By Admin | Updated: June 28, 2014 02:33 IST2014-06-28T02:33:53+5:302014-06-28T02:33:53+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागासाठी मूल्यांकनाला होणारा उशीर ही नेहमीचीच डोकेदुखी आहे.

प्राध्यापकांना अल्टिमेटम!
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागासाठी मूल्यांकनाला होणारा उशीर ही नेहमीचीच डोकेदुखी आहे. यंदादेखील परीक्षांच्या निकालाच्या गाडीने हवा तसा वेग घेतलेला नाही. लवकरात लवकर निकाल लागावेत यासाठी परीक्षा नियंत्रकांनी मूल्यांकनाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या प्राध्यापकांना एका तातडीच्या अधिसूचनेद्वारे ‘अल्टिमेटम’ दिला आहे. मूल्यांकन करणे ही संबंधित प्राध्यापकांची जबाबदारी आहे आणि जर त्यात काही त्रुटी असतील तर महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येऊ शकते, असा इशाराच देण्यात आला आहे.
विद्यापीठात मूल्यांकनासाठी दरवर्षी निरनिराळ्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येते.
मूल्यांकनाची प्रक्रिया सुरळीतपणे चालावी आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी सहकार्य करणे ही प्राध्यापकांची जबाबदारीच असते. विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या ‘स्पॉट’ मूल्यांकन केंद्रांवर निर्धारित वेळापत्रकापणे जाणे व मूल्यांकन करणे हेदेखील प्राध्यापकांकडून अपेक्षित असते. परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक प्राध्यापक हे मूल्यांकनासाठी एकतर येतच नाही किंवा अनियमितपणे येतात. त्यामुळे मूल्यांकनाच्या कामाला फटका बसतो व निकाल लावण्यास उशीर होतो. यातूनच विद्यार्थ्यांच्या हातातील
अनेक करिअरच्या तसेच उच्च शिक्षणासाठी प्रवेशाच्या संधी निसटून जातात. या त्रुटींचे खापर मात्र विद्यापीठ किंवा परीक्षा विभागावर फोडण्यात येते.
पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेला अशाच प्रकारे विलंब होतो.यंदा उन्हाळी प्रक्रियांच्या मूल्यांकनाला अनेक प्राध्यापक नियमितपणे येत नसल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांना आढळून आले.
वचक कोण ठेवणार ?
नागपूर : प्राध्यापकांवर वचक रहावा व मूल्यांकनाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी याकरिता परीक्षा नियंत्रकांनी गुरुवारी तातडीची अधिसूचना काढली. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ३२ (५) (ग) नुसार मूल्यांकन व परीक्षेसंदर्भातील कामात बेजबाबदारपणा, अकार्यक्षमता, हलगर्जीपणा दाखविणे हा गंभीर दुर्व्यवहार मानण्यात येतो. परीक्षेशी संबंधित कामांत गुंतलेले सर्व प्राध्यापक हे विद्यापीठाच्या शिस्तपालनाच्या कार्यकक्षेत येतात. आॅर्डनन्स क्रमांक १७ नुसार शिस्तीचा भंग करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईचा विद्यापीठाला अधिकार आहे. त्यामुळे मूल्यांकनाला प्राध्यापकांचे वेळापत्रकानुसार न येणे ही स्थिती गंभीर आहे. विद्यापीठाने याची गंभीरपणे नोंद घेतली आहे व नियमांचे पालन न करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या अधिसूचनेत देण्यात आला आहे.
प्राचार्यांनादेखील सूचना
दरम्यान, या अधिसूचनेत प्राचार्यांनी विद्यापीठाला सहकार्य करावे, अशी सूचना देण्यात आली आहे. जे प्राध्यापक मूल्यांकनाच्या कार्यात गुंतले असतील त्यांच्यासमोर महाविद्यालयांकडून कुठल्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी प्राचार्यांनी घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)