The 'UGC' will be approved for the Rashtra Sant ideology course | नागपूर विद्यापीठ : राष्ट्रसंत विचारधारा अभ्यासक्रमाला 'यूजीसी'ची मान्यता मिळणार

नागपूर विद्यापीठ : राष्ट्रसंत विचारधारा अभ्यासक्रमाला 'यूजीसी'ची मान्यता मिळणार

ठळक मुद्देतुकडोजी महाराजांचा पुण्यस्मरण दिवस प्रशासकीय इमारतीत होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजनागपूरविद्यापीठातील राष्ट्रसंत विचारधारा अभ्यासक्रमाला अखेर ‘यूजीसी’ची मान्यता मिळणार आहे. यामुळे अभ्यासक्रमाला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय ‘पीएचडी’देखील मिळण्यास अडचण येणार नाही. यासंदर्भात लवकरच विद्यापीठाकडून पावले उचलण्यात येणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा अभ्यासक्रम विद्यापीठ पातळीवर सुरू करण्यात आला. त्याला विद्वत् परिषद आणि व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली होती. परंतु, त्या अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परवानगीकरिता पाठवण्यातच आले नाही. विद्यापीठाला कोणताही अभ्यासक्रम सुरू करण्याची स्वायत्तता आहे. परंतु, त्या अभ्यासक्रमाला राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची परवानगी मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्याने राष्ट्रसंत विचारधारा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्याने पीएच.डी. पदवीकरिता नोंदणी केल्यास त्या पदवीलादेखील मान्यता मिळण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला बळकटी मिळण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळणे अनिवार्य असल्याच्या मुद्याकडे श्री गुरुदेव युवा मंचातर्फे लक्ष वेधण्यात आले. अभ्यासमंडळ सदस्य ज्ञानेश्वर रक्षक यांनी ही बाब कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या निदर्शनास आणून दिली. दोन ते तीन महिन्यातच सर्व प्रक्रिया आटोपून मान्यता प्राप्त करुन देण्यात येईल ,असे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याचे रक्षक यांनी सांगितले.
याशिवाय ११ ऑक्टोबर रोजी तुकडोजी महाराजांचा पुण्यस्मरण दिवस हा मानवता दिन म्हणून विद्यापीठात आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम प्रशासकीय इमारतीत होईल. शिवाय महाविद्यालय पातळीवरदेखील आयोजनासाठी पत्र लिहिण्यात येणार आहे.

Web Title: The 'UGC' will be approved for the Rashtra Sant ideology course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.