न्या. उदय लळीत यांचे नागपूरशी जिव्हाळ्याचे संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 19:37 IST2022-08-04T19:36:29+5:302022-08-04T19:37:23+5:30

Nagpur News देशाचे ४९वे सरन्यायाधीश होणार असलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांचे नागपूरसोबत अगदी जवळचे संबंध आहेत. त्यांचे वडील उमेश लळीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायमूर्ती होते.

Uday Lalit has close ties with Nagpur | न्या. उदय लळीत यांचे नागपूरशी जिव्हाळ्याचे संबंध

न्या. उदय लळीत यांचे नागपूरशी जिव्हाळ्याचे संबंध

ठळक मुद्देवडील उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते

 नागपूर : देशाचे ४९वे सरन्यायाधीश होणार असलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांचे नागपूरसोबत अगदी जवळचे संबंध आहेत. त्यांचे वडील उमेश लळीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायमूर्ती होते. त्यामुळे त्यांनी बालपणीची काही वर्षे नागपूरमध्ये घालविली आहेत. याशिवाय, नागपुरातील अनेक व्यक्तींसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.

नागपुरातील वरिष्ठ वकील जुगलकिशोर गिल्डा यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, न्या. उदय लळीत यांचे वडील १९७३ ते १९७५ या काळात उच्च न्यायालयामध्ये कार्यरत होते. दरम्यान, ते सिव्हिल लाईन्स येथील सौदामिनी बंगल्यामध्ये राहत होते. त्यावेळी न्या. उदय लळीत शालेय शिक्षण घेत होते. त्यानंतर ते मुंबईत स्थानांतरित झाले. त्यांनी कायद्याची पदवी मिळवून आधी मुंबई उच्च न्यायालयात व पुढे सर्वोच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. त्यांनी काही प्रकरणांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही युक्तिवाद केला आहे, तसेच नागपूर व विदर्भातील अनेक प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली आहे.

विधी शिक्षण पद्धतीवर चिंता व्यक्त केली होती

न्या. उदय लळीत हे १५ मार्च २०१५ रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या वतीने सिव्हिल लाईन्सस्थित देशपांडे सभागृह येथे आयोजित वकिलांच्या परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी नागपूरला आले होते. दरम्यान, त्यांनी वर्तमान विधी शिक्षण पद्धतीवर चिंता व्यक्त केली होती. वर्तमान विधी शिक्षणामुळे विद्यार्थी परिपूर्ण वकील होत नाही. वकिली व्यवसायाच्या गरजा काय आहेत, वकिलांमध्ये कोणती मूल्ये असायला पाहिजेत, वकिलांना नेमके काय करायचे असते, इत्यादी बाबी विद्यार्थ्यांना शिकविल्या जात नाहीत, असे ते म्हणाले होते.

Web Title: Uday Lalit has close ties with Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.