दोन घरी जास्त काम करेन, पण पोरीला शिकवेनच

By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:01+5:302016-06-07T07:42:01+5:30

तिच्या नावातच ‘यश’ सामावले आहे. अंगभूत हुशारीला कष्टांची जोड मिळाली अन् गरिबीच्या संघर्षलाटेवर पोहत तिने यशाचा

Two will work more at home but do not teach the girl | दोन घरी जास्त काम करेन, पण पोरीला शिकवेनच

दोन घरी जास्त काम करेन, पण पोरीला शिकवेनच

योगेश पांडे ल्ल नागपूर
तिच्या नावातच ‘यश’ सामावले आहे. अंगभूत हुशारीला कष्टांची जोड मिळाली अन् गरिबीच्या संघर्षलाटेवर पोहत तिने यशाचा किनारा गाठला. परंतु यानंतर प्रश्न उभा ठाकला, पुढे काय ? पण येथे तिच्या माऊलीचा खांद्यावर हात पडतो, ‘पोरी, तू लढत रहा. मी तुझ्या पाठीशी आहे’. मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणारी ती माऊली आता कंबर कसून तयार झाली आहे. आणखी जास्त काम करेल, पण मुलींना शिकवूनच राहील. शिक्षणाच्या बाबतीत अजिबात वाकणार नाही, अशी भूमिका घेतलेली ही आई खरोखर ‘लेकी वाढवा, लेकी शिकवा’ या घोषणेला प्रत्यक्षात उतरवत आहे.
गजानन विद्यालयातील विद्यार्थिनी असलेल्या यशश्री सुधीर सुलभेवार हिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. तिचे वडील ‘मंडप’ टाकण्याचे काम करतात. तर आई शारदा घरोघरी जाऊन स्वयंपाक करते. चार मुली असल्याने त्यांचा शिक्षणाचा खर्च पेलता पेलताच या दाम्पत्याच्या नाकी नऊ येतात. घर अतिशय लहान, अभ्यासाला जागा कमी अशा स्थितीतदेखील यशश्रीने हार मानली नाही. तिने दहावीच्या वर्षभर मन लावून अभ्यास केला आणि थोडेथोडके नव्हे तर चक्क ९४.६० टक्के गुण मिळविले.
यशश्रीला अभियंता होण्याची फार इच्छा आहे. परंतु तिच्या दोन मोठ्या बहिणींचे अगोदरपासूनच शिक्षण सुरू आहे. सर्वात मोठी बहीण अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत आहे आणि त्याहून धाकटी बहीण वाणिज्य शाखेला आहे.
पोटाला चिमटा घेऊन या पोरींचे शिक्षणाचा खर्च कसाबसा उचलणाऱ्या सुलभेवार दाम्पत्याला चिंता आहे ती तिसऱ्या मुलीच्या शिक्षणाची. परंतु काहीही झाले तरी यशश्रीला हवे तेच शिक्षण घेऊ देणार असा संकल्प तिच्या आईने केला आहे. यासाठी वेळ पडली तर आणखी दोन घरी स्वयंपाक करेन, असे तिच्या आईने सांगितले. यशश्रीला विश्वास आहे की ती एक दिवस नक्की अभियंता होईल व घरच्यांचे स्वप्न पूर्ण करेल.

Web Title: Two will work more at home but do not teach the girl