मनपाच्या अमृत कलशासह दोन स्वयंसेवक मुंबईत दाखल; मेरी माटी, मेरा देश, कलश मुंबईमार्गे दिल्लीसाठी होणार रवाना
By गणेश हुड | Updated: October 26, 2023 18:59 IST2023-10-26T18:59:09+5:302023-10-26T18:59:31+5:30
मनपाच्या दहा झोन अंतर्गत संकलित केलेल्या माती आणि तांदुळाचे अमृत कलशाला घेऊन प्रतीक तुरुतकाने आणि शुभम सुपारे हे मनपाचे स्वयंसेवक बुधवारी मुंबई येथे रवाना झाले होते.

मनपाच्या अमृत कलशासह दोन स्वयंसेवक मुंबईत दाखल; मेरी माटी, मेरा देश, कलश मुंबईमार्गे दिल्लीसाठी होणार रवाना
नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाचा निर्देशानुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत महापालिकाद्वारे गोळा करण्यात आलेली शहरातील मातीचे कलश घेऊन गुरुवारी मनपाचे दोन स्वयंसेवक मुंबई येथे पोहचले. मुंबईहून कलश दिल्लीला पाठविले जाणार आहे.या उपक्रमात शहरातील १० लाख १३५१ कुटूंबांनी उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.
मनपाच्या दहा झोन अंतर्गत संकलित केलेल्या माती आणि तांदुळाचे अमृत कलशाला घेऊन प्रतीक तुरुतकाने आणि शुभम सुपारे हे मनपाचे स्वयंसेवक बुधवारी मुंबई येथे रवाना झाले होते, याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर स्वयंसेवकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मनपाचे उपायुक्त रवींद्र भेलावे, सुरेश बगळे, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी रेल्वे स्थानकावर प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात शहरात राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत शिलाफलकम, पंच प्रण प्रतिज्ञा आणि सेल्फी, वसुधा वंदन, वीरों का वंदन, अमृत कलश यात्रा उपक्रमांना आमदार, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यातील सर्व अमृत कलशांचे २७ ऑक्टोबरला पूजन करुन ते दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहेत.