बाईक चोरून पळाले दोन मनोरुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:05 IST2018-05-29T23:05:24+5:302018-05-29T23:05:54+5:30
भिंत ओलांडून मनोरुग्ण पळून जाण्याच्या घटना प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी नव्या नाहीत. परंतु नियोजन करून बाईक चोरून पळून जाण्याची पहिलीच घटना मंगळवारी उघडकीस आल्याने रुग्णालयात खळबळ उडाली आहे. हे रुग्ण खरंच मनोरुग्ण होते काय, याबाबत शंकाही उपस्थित केली जात आहे.

बाईक चोरून पळाले दोन मनोरुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भिंत ओलांडून मनोरुग्ण पळून जाण्याच्या घटना प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी नव्या नाहीत. परंतु नियोजन करून बाईक चोरून पळून जाण्याची पहिलीच घटना मंगळवारी उघडकीस आल्याने रुग्णालयात खळबळ उडाली आहे. हे रुग्ण खरंच मनोरुग्ण होते काय, याबाबत शंकाही उपस्थित केली जात आहे.
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून दरवर्षी चार-पाच रुग्ण पळून जायचे, परंतु शासन याकडे लक्ष देत नव्हते. अखेर आमदार तारासिंग यांना या विषयाला घेऊन अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करावे लागले. परिणामी, रुग्ण पळून जाण्यासाठी कारणीभूत ठरत असलेली कमी उंचीच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी एक कोटी आठ लाखांचा निधी मिळाला. सहा फुटाची भिंत १२ फुटाची झाली. भिंत ओलांडून पळून जाण्याच्या घटना बंद झाल्या. परंतु सुरक्षा रक्षकांना चकमा देऊन मुख्य प्रवेशद्वारातून पळण्याच्या घटना घडल्या. रुग्ण पळण्याच्या घटनेला रुग्णालय प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याने मंगळवारी पुन्हा अशीच घटना घडली.
असे पळाले रुग्ण
सूत्रानुसार, गांजाच्या आहारी जाऊन मानसिक स्थितीवर परिणाम झालेल्या रामेश्वरी नागपूर येथील २८ वर्षीय युवकाला व ३८ वर्षीय चंद्रपूर येथील एका इसमाला न्यायालयाच्या निर्देशानुसार १० दिवसांपूर्वीच मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. वॉर्ड क्र. ८ मध्ये या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास गजानन नाडेकर नावाचा रुग्णालयाचा स्वयंपाकी सकाळचा नाश्ता व दुपारच्या भोजनाची तयारी करण्यासाठी आला. त्याने स्वयंपाकगृहासमोर बाईक उभी केली. याच दरम्यान या दोन्ही मनोरुग्णांनी ती बाईक चोरून धूम ठोकली. विशेष म्हणजे, मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडेपर्यंत कुणीच अडविले नाही. येथून ते रामेश्वरी येथील एकाच्या घरी आले, कपडे बदलविले, पैसे घेतले आणि परत त्याच बाईकने पळाले. रस्त्यात बाईकमधील पेट्रोल संपल्याने ती तिथेच टाकून पसार झाले.