एकाच खुनाचे दोन खटले, आरोपीला जन्मठेप

By Admin | Updated: October 9, 2015 03:10 IST2015-10-09T03:10:26+5:302015-10-09T03:10:26+5:30

वडगाव धरण खूनप्रकरणी दोन खटले चालून चार वर्षांपूर्वी एका आरोपीला आणि आता बुधवारी दुसऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Two murder cases, the accused sentenced to life imprisonment | एकाच खुनाचे दोन खटले, आरोपीला जन्मठेप

एकाच खुनाचे दोन खटले, आरोपीला जन्मठेप


नागपूर : वडगाव धरण खूनप्रकरणी दोन खटले चालून चार वर्षांपूर्वी एका आरोपीला आणि आता बुधवारी दुसऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दुसरी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजयकुमार शुक्ला यांच्या न्यायालयाने सुनावली.
वर्धेच्या दत्ता मेघे मेडिकल कॉलेजनजीक साईनगर येथे राहणारे अविनाश ऊर्फ बाळू गंगाधर कुबडे यांच्या खुनाचा हा खटला आहे. यापूर्वी १८ जानेवारी २०११ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या न्यायालयाने आरोपी भोजराज ऊर्फ भोज्या तुकाराम जंगले (२२) रा. हिंगणघाट याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणातील दुसरा आरोपी सुरेश श्यामराव कोडापे (२६) रा. हिंगणघाट हा फरार होता. त्याला २५ जुलै २०१२ रोजी अटक करण्यात आली. त्याच्यावर खटला चालवून त्याला भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप, १ हजार रुपये दंड आणि २०१ कलमांतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड सुनावण्यात आला. या खुनातील आणखी एक आरोपी सचिन कांबळे हा पहिला खटला सुरू असताना मरण पावला.
प्रकरण असे की, मृत अविनाश आणि आरोपी हे बुटीबोरी भागात एकत्र कंत्राटी काम करायचे. अविनाशने भोजराज याच्याकडून पैसे घेतले होते. परंतु तो पैसे देत नव्हता. त्यामुळे त्यांनी अविनाशचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले होते.
२८ सप्टेंबर २००९ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सचिन कांबळे याने अविनाश याला मोबाईलवर संपर्क करून वर्धा येथून बुटीबोरी येथे बोलावून घेतले होते.
तो आपल्या बजाज पल्सरने आला होता. त्याला म्हाडा कॉलनीतील खोलीत भरपूर दारू पाजून आणि नायलॉन दोरीने हातपाय बांधून मारहाण केली होती. त्यानंतर मारुती व्हॅनमध्ये कोंबून चारगाव -बेला दरम्यानच्या वडगाव धरणात फेकून दिले होते. बेला पोलीस ठाण्याचे ठाणेदार ए. जे. रामटेके यांनी तपास करून आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील वसंत नरसापूरकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Two murder cases, the accused sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.