उडवाउडवीची उत्तरे देणारे दोन अल्पवयीन निघाले सराईत वाहनचोर
By योगेश पांडे | Updated: May 22, 2023 17:20 IST2023-05-22T17:19:23+5:302023-05-22T17:20:11+5:30
Nagpur News सराईत वाहनचोर असलेले दोन अल्पवयीन आरोपींसह एकूण तीन जण ताब्यात घेण्यात आले आहेत. कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

उडवाउडवीची उत्तरे देणारे दोन अल्पवयीन निघाले सराईत वाहनचोर
योगेश पांडे
नागपूर : सराईत वाहनचोर असलेले दोन अल्पवयीन आरोपींसह एकूण तीन जण ताब्यात घेण्यात आले आहेत. कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या आरोपींनी शहरातील चार ठिकाणांहून दुचाकींची चोरी केली होती.
३० जानेवारी रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास जुनी कामठी मार्गावरील बेले नगरातील देवीदास टिपले यांची मोटारसायकल चोरी गेली होती. या गुन्ह्याचा कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाकडून तपास सुरू होता. १८ मे रोजी डिप्टी सिग्नल भागात पेट्रोलिंग सुरू असताना सकाळी पावणेनऊ वाजता एक मुलगा आरटीओ कार्यालयाच्या मैदानात एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर बसलेला दिसून आला. त्याला कागदपत्रांची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्याला कठोर शब्दांत विचारणा केल्यावर त्याने तो अल्पवयीन असल्याचे सांगत दुचाकी चोरीची असल्याचे कबुल केले.
त्याच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. त्यांच्यासमोर विचारणा केली असता आणखी एका अल्पवयीन मुलगा व अब्दुल रहमान उर्फ रम्मू (२३, शांतीनगर) याच्यासोबत मिळून चोरी केल्याचे त्याने सांगितले. आरोपींनी जुनी कामठी, यशोधरानगर, कोराडी व शांतीनगर हद्दीतून आणखी चार गुन्हे केल्याचेदेखील सांगितले. रम्मूला पोलिसांनी अटक केली असून आरोपींकडून पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर, विश्वास पुल्लरवार, राहुल सावंत, अजय गर्जे, चंद्रशेखर यादव, दीपक धानोरकर, रविकुमार शाहू, अभय साखरे, अशोक तायडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.