मेडिकलच्या दोन डॉक्टरांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST2021-05-09T04:10:00+5:302021-05-09T04:10:00+5:30

नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांचा मोठा भार असलेल्या मेडिकलच्या दोन निवासी डॉक्टरांना शनिवारी सायंकाळी मेडिकल चौकात तीन ते चार अज्ञात ...

Two medical doctors beaten | मेडिकलच्या दोन डॉक्टरांना मारहाण

मेडिकलच्या दोन डॉक्टरांना मारहाण

नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांचा मोठा भार असलेल्या मेडिकलच्या दोन निवासी डॉक्टरांना शनिवारी सायंकाळी मेडिकल चौकात तीन ते चार अज्ञात इसमांनी वाद घालून मारहाण केल्याने खळबळ उडाली. आरोपीला अटक करण्याच्या मागणीला घेऊन मेडिकलच्या निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने संपाचे हत्यार उपसले होते. परंतु रात्री संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याने व मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी मार्डच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याने पुढील कारवाई होईपर्यंत संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, रमजान महिना सुरू असल्याने दोन निवासी डॉक्टरांचे रोजे सुरू आहेत. सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान फळे विकत घेण्यासाठी मेडिकल चौकात आले. हातठेल्यावरील फळे विकत घेऊन दुचाकीवर बसत असताना एका अज्ञात इसमाला चुकून पाय लागला. डॉक्टरांनी माफीसुद्धा मागितली. परंतु त्या इसमासोबत असलेल्या दोघांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. एकाने दुचाकीची चावी काढली. डॉक्टरांनी स्वत:ची ओळख देत उपवास सुरू असल्याचेही सांगितले. परंतु त्या इसमाने आणखी दोघांना बोलविले. त्यांच्या हातात गोटे होते. त्याचवेळी त्या अज्ञात इसमाने डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेने लोक जमा होताच मारहाण करणारे ‘एमएच ३१ डीसी ५६३३’ या क्रमांकाच्या इंडिगो कारमधून पळून गेले. याची माहिती इतर निवासी डॉक्टरांना मिळताच मेडिकलचे १००वर डॉक्टर मेडिकल चौकात जमा झाले. जखमी डॉक्टरांना मेडिकलच्या कॅज्युअल्टीत दाखल केले. मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सजल बंसल यांच्या नेतृत्वात अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रात्री ८ वाजेपर्यंत दोषींना अटक न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला होता. रात्रीचे ९ वाजूनही कोणालाच अटक झाली नसल्याने कामबंद आंदोलन हाती घेण्यात आले. परंतु रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान दोन संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. याचदरम्यान अधिष्ठाता डॉ. गुप्ता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. गावंडे यांनी निवासी डॉक्टरांची समजूत काढल्याने तूर्तास संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परंतु डॉ. बंसल यांनी ‘लोकमत’ला सांगितले, रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व आरोपींना अटक न झाल्यास आम्ही कामबंद आंदोलन करू, असा इशाराही दिला.

-मेडिकलमध्ये कोरोनाचे ८३६ रुग्ण

मेडिकलमध्ये ८३६ कोरोनाचे तर, ५००वर नॉन कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या सेवेत २४ तास निवासी डॉक्टर असतात. विशेषत: कोविड रुग्णाच्या वॉर्डात फार कमी वरिष्ठ डॉक्टर जात असल्याने निवासी डॉक्टरांवरच या रुग्णांचा भार असतो. यामुळे हे डॉक्टर संपावर गेल्यास रुग्णसेवा ढासळण्याची शक्यता आहे.

Web Title: Two medical doctors beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.