दोन आयब्रेस्ट एक्झाम उपकरणासाठी निधी देणार
By Admin | Updated: October 7, 2016 03:02 IST2016-10-07T03:02:31+5:302016-10-07T03:02:31+5:30
पूर्वी कॅन्सरमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर नंबर एकवर तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा (ब्रेस्ट) कॅन्सर होता,

दोन आयब्रेस्ट एक्झाम उपकरणासाठी निधी देणार
चंद्रशेखर बावनकुळे : मेडिकलमध्ये तपासणी कक्षाचे उद्घाटन
नागपूर : पूर्वी कॅन्सरमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर नंबर एकवर तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा (ब्रेस्ट) कॅन्सर होता, मात्र मागील ३० वर्षांत यात बदल झाला आहे. हा कॅन्सर जगभरातल्या स्त्रियांच्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरत आहे. यामुळे याचे वेळीच निदान होऊन उपचार होणे आवश्यक आहे. म्हणूनच आणखी दोन ‘आयब्रेस्ट एक्झाम’ हे अत्याधुनिक उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी निधी दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) क्ष-किरण विभागातर्फे बाह्यरुग्ण विभागात जागतिक स्तन कर्करोग जागृती अभियान व ‘आयब्रेस्ट एक्झाम’द्वारे स्तन कॅन्सर तपासणी कक्षाचे उद्घाटनप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, नगरसेविका सुमित्रा दुबे, ‘नो टच ब्रेस्ट कॅम्प’च्या प्रमुख गौरी नावलकर आदी उपस्थित होत्या. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, महिलांमधील स्तन कर्करोगाची तपासणी नव्या आधुनिक आयब्रेस्ट एक्झाम या पर्यावरणस्नेही व क्ष किरण विरहित यंत्राद्वारे होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातही आरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासणी करणे सहज शक्य होईल. यापूर्वी ही तपासणी ‘मेमोग्राफी’द्वारे करण्यात येत होती. मात्र या उपकरणाच्या तुलनेत हे उपकरण सहज हाताळण्यायोग्य आहे. यामुळे जास्तीत जास्त महिलांची तपासणी करणे शक्य होणार आहे. प्रास्ताविक डॉ. निसवाडे यांनी केले. संचालन क्ष किरण विभागाच्या प्रमुख डॉ. आरती आनंद यांनी केले.
यावेळी उपअधिष्ठाता डॉ. दिनकर कुंभलकर, डॉ. राज गजभिये, डॉ. नलिनी फुके, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. सी.एम. बोकडे, डॉ. रमेश पराते, डॉ. प्रशांत बागडे, डॉ. समीर गोलावर, डॉ. देशमुख, डॉ. गोसावी, डॉ. गिरीश भुयार आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
२५ महिलांमधून अर्ध्या महिलांच्या स्तनात गाठ
उद्घाटनानंतर ‘आयब्रेस्ट एक्झाम’ या उपकरणावर २५ महिलांची तपासणी करण्यात आली. यात १३ महिलांच्या स्तनात गाठ असल्याचे निदान झाले. या महिलांना पुढील उपचारासाठी संबंधित विभागात पाठविण्यात आले. या उपकरणावर रोज ७० रुग्ण तपासले जाणार असल्याची माहिती डॉ. रमेश पराते यांनी दिली.