एपी एक्स्प्रेसने दोन कोरोना संशयितांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 00:50 IST2020-07-15T00:48:47+5:302020-07-15T00:50:01+5:30
एसी एक्स्प्रेसमधून दोन कोरोना संशयित प्रवास करीत असल्याच्या सूचनेमुळे रेल्वे वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.

एपी एक्स्प्रेसने दोन कोरोना संशयितांचा प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसी एक्स्प्रेसमधून दोन कोरोना संशयित प्रवास करीत असल्याच्या सूचनेमुळे रेल्वे वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. कर्तव्यदक्ष उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाकडून आरपीएफ, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे डॉक्टरांना सूचना देण्यात आली. गाडी येताच त्या दोन संशयितांना नागपूर रेल्वे स्थानकावर उतरविले. त्यांना मेयोच्या विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार २० ते २५ वयोगटातील दोन युवक एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांच्या ग्रूपमधील काही युवकांना विलगीकरण ठेवण्यात आले. यात या दोन युवकांचाही समावेश होता. मात्र, विलगीकरण कक्षातील असुविधेमुळे त्रस्त झालेल्या युवकांनी केंद्रामधून पळ काढला. लगबगीने रेल्वे तिकीट घेतले आणि ०२६९१ बेंगळूरू - न्यू दिल्ली विशेष रेल्वे गाडीने ते प्रवासाला निघाले. नागपूरपर्यंतच त्यांचे तिकीट होते.
दरम्यान विलगीकरण कक्षातून दोन युवक पळाल्याची माहिती नागपूर रेल्वे स्थानकाचे स्टेशन व्यवस्थापकांना मिळाली. गाडी येण्याला वेळ होता. तत्पूर्वी ही माहिती त्यांनी लोहमार्ग पोलीस, आरपीएफ तसेच रेल्वे डॉक्टरांना दिली. गाडी ३.२० वाजता येणार होती. तत्पूर्वी सहायक निरीक्षक म्हेत्रे, उपनिरीक्षक रवी वाघ, आरपीएफ अधिकारी यांच्यासह रेल्वे डॉक्टर प्लॅटफार्मवर उपस्थित होते. गाडी येताच बी-१० डब्यातील त्या दोन्ही युवकांना खाली उतरविण्यात आले. लगेच रेल्वेच्या रुग्णावाहिकेव्दारे त्या दोघांना मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. ही प्रक्रिया होईपर्यंत गाडी थांबून होती. दरम्यान बेंगळूरू ते नागपूरपर्यंत आपण कोरोना संशयितांसोबत प्रवास केल्याची भीती त्या डब्यातील प्रवाशांच्या मनात होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे त्या गाडीला निर्जंतुकीकरण करण्यात आल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासाला निघाली.