नागपुरातील अडीच हजार पाकिस्तानी, बांगलादेशींच्या नागरिकत्वाचा मार्ग मोकळा; अनेक वर्षांपासून प्रयत्न 

By नरेश डोंगरे | Published: March 15, 2024 07:58 PM2024-03-15T19:58:53+5:302024-03-15T19:58:56+5:30

प्रदीर्घ काळापासून ही मंडळी भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.

Two and a half thousand Pakistanis and Bangladeshis in Nagpur were cleared for citizenship | नागपुरातील अडीच हजार पाकिस्तानी, बांगलादेशींच्या नागरिकत्वाचा मार्ग मोकळा; अनेक वर्षांपासून प्रयत्न 

नागपुरातील अडीच हजार पाकिस्तानी, बांगलादेशींच्या नागरिकत्वाचा मार्ग मोकळा; अनेक वर्षांपासून प्रयत्न 

नागपूर: अनेक वर्षांपासून भारताचे नागरिकत्व मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या, नागपुरात वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानमधील दोन हजारांवर शरणार्थींसह बांगलादेशी आणि अफगाणी नागरिकांनाही अखेर भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रदीर्घ काळापासून ही मंडळी भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.

भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध अधिक चांगले व्हावे, या उद्देशाने २२ जुलै १९७६ ला समझोता एक्स्प्रेस नामक ट्रेन सुरू करण्यात आली होती. मात्र १८ फेब्रुवारी २००७ ला समझोता एक्स्प्रेस हरियाणातून धावत असताना पानिपतजवळ या गाडीत भयानक बॉम्बस्फोट झाले. त्यात ६८ प्रवाशांचे जीव गेले आणि कित्येकांना कायमचे अपंगत्वही आले. त्यानंतर या ट्रेनमधील नागरिकांच्या आवागमनावर वाद होऊ लागला. या पार्श्वभूमीवर अखेर ८ ऑगस्ट २०१९ पासून समझोता एक्स्प्रेसचे संचालन बंद करण्यात आले.

या गाडीने भारतात आपल्या नातेवाइकांकडे येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या मोठी होती. येथे येण्यासाठी कुणी नातेवाइकांकडील कार्यक्रम, कुणी पर्यटन तर कुणी उपचाराचे निमित्त सांगून तसा दीर्घ मुदतीचा व्हिजा (एलटीव्ही) मिळवला होता. येथे थांबल्यानंतर काहींना येथेच रोजगार मिळाल्याने त्यांनी आपल्या व्हिजामध्ये वेळोवेळी वास्तव्यासाठी मुदतवाढ करून घेतली. यातील अडीच हजारांवर नागरिक असे आहेत की त्यांची मुले येथेच शिकून लहानांची मोठीही झाली. मात्र, त्यांच्याकडे अधिकृत भारतीय नागरिकत्व नाही. गेल्या १० ते १५ वर्षांपासून ते नागपुरात वास्तव्याला असल्यामुळे ते अधिकृतरीत्या पोलिस रेकॉर्डवरही आहे. त्यामुळे या सर्वांना आता भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सहा वर्षांची अट
११ मार्च २०२४ ला केंद्र सरकारने लागू केलेल्या भारतीय नागरिकत्व (सुधारणा) कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. अर्थात भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी त्या व्यक्तीचे भारतात किमान सहा वर्षे वास्तव्य अपेक्षित आहे. प्रारंभी वास्तव्याची अट ११ वर्षांची होती. ती या कायद्यामुळे शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे.
 
सर्वाधिक पाकिस्तानी, अफगाणी फक्त तीन
संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नागपुरात अनेक वर्षांपासून वास्तव्याला असलेल्या विदेशी नागरिकांमध्ये सर्वाधिक संख्येत पाकिस्तानी आहेत. त्यांची संख्या २१०० ते २२०० दरम्यान आहे. बांगलादेशी नागरिकांची संख्या १५० वर आहे. तर, अफगाणी मात्र केवळ ३ आहेत. हे सर्व आता सरकारच्या वेबपोर्टलवर जाऊन नागरिकत्व मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Web Title: Two and a half thousand Pakistanis and Bangladeshis in Nagpur were cleared for citizenship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.