जितेंद्र उके लोकमत न्यूज नेटवर्कमेटपांजरा: काटोल तालुक्यातील मेटपांजरा येथील कविता ऊर्फ वर्षा अमोल टेकाम (३२) तिच्या आयुष्याची स्वप्नं मोठी होती. सहा वर्षाच्या जुळ्या लेकरांच्या चेहऱ्यावरचं हास्य टिकावं, त्यांच्या भविष्यासाठी थोडं जास्त कमावता यावं म्हणून ती रोज पहाटे घराबाहेर पडायची. 'आई, लवकर ये...' असं म्हणत मुलगा-मुलगी तिच्या पदराला धरायचे; आणि ती हसत हसत आश्वासन द्यायची 'काम करून येते, लगेच परत येते.' मात्र, त्या दिवशी सकाळी घरातून निघालेली कविता परत आलीच नाही.
एसबीएल एनर्जी कंपनीतील भीषण स्फोटाने तिचे आयुष्य क्षणात हिरावून घेतले. सकाळी नेहमीप्रमाणे ती जुळ्या मुलांना घरी ठेवून कामावर गेली होती. निरागस लेकरं दारात उभी राहून आईची वाट पाहत होती. दुपार सरली, संध्याकाळ झाली. पण, दार ठोठावणारा आवाज आला नाही. 'आई जाऊन परत येणारच,' या विश्वासावर जगणाऱ्या त्या दोन चिमुकल्यांच्या आयुष्यात नियतीने क्रूर वळण आणले. पती स्कूल व्हॅन चालवून संसाराचा गाडा ओढत होता. उत्पन्न मर्यादित असले तरी कुटुंबात समाधान होते. कविताने घराला हातभार लावण्यासाठी कंपनीत नोकरी स्वीकारली. काही किलोमीटरवरील कंपनीत चांगल्या पगाराच्या आशेने ती रुजू झाली होती. मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या छोट्या-छोट्या स्वप्नांसाठी तिने घेतलेला तो निर्णय तिच्या आयुष्याचा शेवट ठरला.
स्फोटाची बातमी गावात पोहोचताच मेटपांजरा सुन्न झाला. प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न. 'इतकं मोठं दुःख त्या कुटुंबावरच का?' कविताच्या घरासमोर शोकाकुलांची गर्दी उसळली. जुळी मुलं आईचा फोटो हातात धरून रडत होती. 'आई कधी येणार?' हा प्रश्न ऐकून उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. एका क्षणात हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं.
दोन निष्पाप जिवांच्या डोक्यावरचं आईचं छत्र कायमचं हरपलं. पतीच्या खांद्यावर आता केवळ संसाराची जबाबदारी नाही, तर आईविना वाढणाऱ्या दोन चिमुकल्यांचं भविष्य उभं करण्याचं प्रचंड ओझं आहे.
या भीषण स्फोटाने केवळ एका महिलेचा जीव घेतला नाही, तर दोन लेकरांचं बालपण, एका कुटुंबाचं सुख आणि एका गावाचा आनंदही हिरावून घेतला आहे. मेटपांजरा आजही त्या धक्क्यातून सावरलेला नाही. कविताच्या आठवर्णीनी घराचा प्रत्येक कोपरा ओला झाला आहे आणि दाराशी उभ्या असलेल्या त्या दोन चिमुकल्यांच्या डोळ्यांत अजूनही एकच आशा दाटून आलेली आहे... 'आई येईल... ना?'
Web Summary : A mother's promise to her twins turned tragic after a fatal factory explosion. Leaving behind grieving children and a husband burdened with immense responsibility. The village mourns the loss, grappling with the sudden devastation.
Web Summary : एक माँ का अपने जुड़वाँ बच्चों से किया वादा एक घातक कारखाने के विस्फोट के बाद दुखद अंत में बदल गया। शोक संतप्त बच्चों और एक पति को भारी जिम्मेदारी के साथ छोड़ दिया। गाँव इस अचानक हुई तबाही से जूझ रहा है।