ठगबाज जोशीला २० पर्यंत पीसीआर
By Admin | Updated: August 18, 2014 00:29 IST2014-08-18T00:29:51+5:302014-08-18T00:29:51+5:30
आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा रविराज इन्व्हेस्टमेंट व स्ट्रॅटेजिस कंपनीचा प्रमुख राजेश सुरेश जोशी (४४) याला शनिवारी जिल्हा सत्र

ठगबाज जोशीला २० पर्यंत पीसीआर
रविराज फायनान्स घोटाळा : ५७ जणांकडून ३.१९ कोटी लुबाडले
नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा रविराज इन्व्हेस्टमेंट व स्ट्रॅटेजिस कंपनीचा प्रमुख राजेश सुरेश जोशी (४४) याला शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी.एम. लालवानी यांनी २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिला. याआधी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. मुळे यांनी त्याला १० दिवसांचा पीसीआर दिला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी जोशीकडून विविध आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे जप्त केली. शिवाय त्याने कंपनीच्या खात्यातून अंजनगाव येथील रविराज कृषी प्रा.लि. या कंपनीकडे ३४ लाख रुपये वळते केले आहे. तसेच त्याने सप्टेंबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या काळात कंपनीच्या आयसीआयसीआय बँकेतील खात्यातून ५० लाख रुपये रोख विड्रॉल केले. त्याच्याकडून जप्त केलेल्या कागदपत्रांची विचारपूस आणि वाहने जप्त करायची असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विश्वास देशमुख यांनी न्यायालयात केला. जोशी याच्याकडे रामदासपेठ येथील रचना सोसायटीमध्ये फ्लॅट, सोनेगाव येथे भूखंड, कामठी आणि मेट हिरडी (कारंजा तहसील) येथे जमीन आणि देवनगर येथे कार्यालय व निवासाची जागा आहे. सर्व जागेची कागदपत्रे पोलिसांच्या ताब्यात आहेत.
५७ गुंतवणूकदारांची ३.१६ कोटींची फसवणूक
आतापर्यंत राजेश जोशीच्या विरोधात ५७ गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या असून त्यांना जोशीने ३ कोटी १६ लाख ९० हजार रुपयांनी फसविले आहे. तक्रारकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजेशने विवेकानंदनगर येथील आपल्य कौस्तुभ बंगल्यात जानेवारी २०१० मध्ये रविराज इन्व्हेस्टमेंट व स्ट्रॅटेजिस कंपनी या नावाने आपला गोरखधंदा सुरू केला होता. या अंतर्गत त्याने रविराज मायनिंग, रविराज अॅग्रो, रविराज वेल्थ मॅनेजमेंट, रविराज इन्फ्राकॉन आणि रविराज सेंटर फॉर सोशल रिकन्स्ट्रक्शन या नावाने वेगवेगळ्या कंपन्या सुरू केल्या होत्या.
अशा होत्या योजना
गुंतवणूकदारांना भुरळ पाडून लुबाडण्याच्या जोशीच्या तीन योजना होत्या. एक लाख रुपये गुंतवल्यास त्यावर महिन्याला तीन टक्के दराने तीन हजार रुपये व्याज, ही पहिली योजना होती. एक लाख रुपये गुंतवल्यास मासिक व्याज न देता तीन महिन्याचे व्याज घेतले तर १० टक्के दराने त्रैमासिक १० हजार रुपये व्याज , ही त्याची दुसरी योजना होती. तिसरी योजना ‘फिक्स डिपॉझिट’ची होती. या योजनेत गुंतवणूक केल्यास अडीच वर्षात मूळ रक्कम दुप्पट, अशी ही योजना होती. विजय वामन मराठे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात ८ जुलै २०१४ रोजी ठगबाज राजेश जोशी, कंपनीचे इतर नातेवाईक संचालक आणि एजंट यांच्याविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, १२० ब आणि महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायदा १९९९ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासनातर्फे विशेष सरकारी वकील विश्वास देशमुख यांनी युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)