तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘सीईओ’पद बळकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:51 AM2020-07-01T00:51:44+5:302020-07-01T00:53:44+5:30

महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात शहरातील लोकप्रतिनिधींमध्ये रोष असताना, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर आता ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे (नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड) ‘सीईओ’पद बळकावले असल्याची गंभीर तक्रार गडकरी यांनी केंद्राकडे केली आहे.

Tukaram Mundhe illegally grabbed the post of 'CEO' | तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘सीईओ’पद बळकावले

तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘सीईओ’पद बळकावले

Next
ठळक मुद्देनितीन गडकरी यांची केंद्राकडे गंभीर तक्रार : कठोर कारवाई करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात शहरातील लोकप्रतिनिधींमध्ये रोष असताना, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर आता ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे (नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड) ‘सीईओ’पद बळकावले असल्याची गंभीर तक्रार गडकरी यांनी केंद्राकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी तसेच केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंग यांना पत्र लिहिले आहे. मुंढे यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.
‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी ‘एसव्हीपी’ची (स्पेशल पर्पज व्हेईकल) निर्मिती करण्यात आली असून, याचे नेतृत्व पूर्णकालीन ‘सीईओ’ करेल अशी तरतूद आहे. याशिवाय यात केंद्र व राज्य शासनाच्या नामनिर्देशित सदस्यांचादेखील समावेश असतो. २०१३ च्या कंपनी अ‍ॅक्टनुसार ‘एनएसएससीडीसीएल’ची नोंदणी झाली असून, नागपूर मनपा व राज्य शासनाची ही संयुक्त कंपनी आहे. यात ‘सीईओ’सोबतच मनपाचे सहा नामनिर्देशित संचालक, राज्य शासनातर्फे नामनिर्देशित चार संचालक, केंद्र शासनाकडून नामनिर्देशित एक संचालक तसेच दोन स्वतंत्र संचालकांचा समावेश आहे. मनपाच्या आयुक्तांची नियुक्ती ही नामनिर्देशित संचालक म्हणूनच होऊ शकते. ३१ डिसेंबर २०१९ पासून संचालक मंडळाची बैठकच झाली नव्हती. तुकाराम मुंढे यांची मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अवैधरीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे ‘सीईओ’पद बळकावले. यानंतर त्यांनी संचालक मंडळाने अगोदर घेतलेले निर्णय मागे घेण्यास सुुरुवात केली. यात निविदा रद्द करणे, ‘कोरोना’च्या संकटात कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करणे, निधीची अफरातफर यासारख्या कामांचा समावेश होता. ही बाब समोर आल्यानंतर सार्वजनिक निधी हडपल्याचा आरोप लावत कंपनीचे नामनिर्देशित संचालक व महापौर संदीप जोशी यांनी मुंढे व ‘सीएफओ’विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
नियमांना धाब्यावर बसवत सुरू असलेला हा एकूणच संपूर्ण प्रकार गंभीर आहे. केंद्र शासनाकडून अनुदानित ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाला नुकसान पोहोचविण्याचा मुंढे यांचा मानस पूर्ण होऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नितीन गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.

परदेशींना ‘सीईओ’ नियुक्तीचे अधिकारच नाही
बेकायदेशीररीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे ‘सीईओ’पद बळकावणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी चेअरमन प्रवीणसिंग परदेशी यांनी आपली नियुक्ती केल्याचा दावा प्रसारमाध्यमांसमोर केला होता. मात्र प्रत्यक्षात नियमानुसार परदेशी यांना चेअरमन या नात्याने ‘एनएसएससीडीसीएल’च्या ‘सीईओ’ची नियुक्ती करण्याचे अधिकारच नाहीत. तो अधिकार केवळ कंपनीच्या संचालक मंडळाकडे आहे, असे नितीन गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

Web Title: Tukaram Mundhe illegally grabbed the post of 'CEO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.