समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा
By Admin | Updated: August 11, 2014 00:54 IST2014-08-11T00:54:01+5:302014-08-11T00:54:01+5:30
समस्या प्रत्येकच क्षेत्रात येतात पण त्यातून मार्ग काढावा लागतो. कलावंतांनाही अनेक समस्या आहेत पण त्यावर सर्वांनीच एकत्रित येऊन उपाय शोधण्याची गरज आहे. कलावंतांच्या समस्या,

समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा
विदर्भ गौरव प्रतिष्ठान : कलावंत मेळावा
नागपूर : समस्या प्रत्येकच क्षेत्रात येतात पण त्यातून मार्ग काढावा लागतो. कलावंतांनाही अनेक समस्या आहेत पण त्यावर सर्वांनीच एकत्रित येऊन उपाय शोधण्याची गरज आहे. कलावंतांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी सर्व वैदर्भीय कलावंतांनी एकत्रित आले पाहिजे आणि संघटनेची बांधणी केली पाहिजे.
पण विदर्भात सर्व कलावंत एकत्रित आल्याचे चित्र दुर्दैवाने दिसत नाही. एकमेकांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करताना परस्परांविषयी असूया निर्माण होत असेल तर विदर्भात कला क्षेत्राचा विकास होणार नाही. कलाक्षेत्रातल्या समस्या सोडविण्यासाठी कलावंतांनी प्रथम एकत्र आले पाहिजे, असे आवाहनवजा बोल डॉ. गिरीश गांधी यांनी कलावंतांना ऐकविले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्यावतीने आज साई सभागृह, शंकरनगर येथे गायक, वादक, निवेदक यांचा कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खा. दत्ता मेघे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय पाटील, सुप्रसिद्ध गायक एम. ए. कादर, संगीत संयोजक सचिन ढोमणे प्रामुख्याने उपस्थित होते.
गिरीश गांधी म्हणाले, काही वेळेला व्यासपीठावर रफींची गीते सादर केल्यावर लोक स्वत:ला मो. रफी किंवा किशोरकुमारच समजतात. स्वत:ला मो. रफी आणि किशोरकुमार समजू नका.
त्यांच्यासारखी साधना करण्याचे आणि गुणात्मकता मिळविण्यासाठी धडपड करण्याचेही लक्ष्य बाळगा. कलावंतांनी नेहमीच समाजासाठी काम करायला हवे. समाजासाठी कलावंतांनी काम केले तर समाजाचाही त्यांना पाठिंबा मिळेल. कलावंतांचा समाजाला त्रास होता कामा नये. विदर्भात गायकांची मोठी परंपरा आहे.
ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी वैदर्भीय कलावंतांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याप्रमाणेच कलावंतांनी स्वत:च्या उणिवा शोधल्या पाहिजेत. प्रत्येकानेच स्वत:ला ए ग्रेड समजू नये. प्रत्येकाच्या दर्जाप्रमाणे त्यांना मानधन मिळाले पाहिजे. त्यासाठी कलावंतांनी स्वत:ची श्रेणी तपासली पाहिजे. अनेक गायक स्वत:च्या गायनात वर्षानुवर्षे बदल करू शकत नाही. दर्जा वाढविण्यावर त्यांनी भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. कादरभाई म्हणाले, इंडियन परफार्मिंग राईट्स कमिटीच्या नियमाप्रमाणे रेकॉर्डिंगच्या वेळी शासनाला मोठ्या प्रमाणात निधी द्यावा लागतो.
त्यामुळे कलावंतांची रॉयल्टी खूपच कमी होते. त्यामुळे सादरीकरण करणाऱ्या कलावंतांना रॉयल्टीपोटी अत्यल्प रक्कम मिळते. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर कार्यक्रम सादर करता येत नाही. त्यासाठी कलावंतांनाच प्रायोजक शोधून आणण्याचे आवाहन केले जाते. सचिन ढोमणे म्हणाले, कलावंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि समाजाला काहीतरी चांगले देण्यासाठी कटिबद्ध आहेत.
पण या कामात आर्थिक चणचण भासते. त्यात नागपुरातील सभागृहाचा किराया कलावंतांना झेपत नाही. शहरातील सभागृहांचे भाडे कमी करण्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
मुंबई - पुण्याच्या कलावंतांना तेथे ग्लॅमर मिळते. ते ग्लॅमर येथल्या कलावंतांना लाभत नसल्याने त्यांची प्रगती होत नाही. यासाठी एखादी संस्था स्थापन करून सर्व कलावंतांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार मो. असीम यांनी मानले. (प्रतिनिधी)