नागपुरात भरधाव ट्रकच्या धडकेत अॅपेचालकाचा मृत्यू : पत्नी, दोन वर्षीय चिमुकल्यासह चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 15:28 IST2017-12-16T15:27:33+5:302017-12-16T15:28:02+5:30
भरधाव ट्रकचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे वनदेवीनगरातील एक हसता खेळता परिवार क्षणात उध्वस्त झाला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी हा अपघात घडला.

नागपुरात भरधाव ट्रकच्या धडकेत अॅपेचालकाचा मृत्यू : पत्नी, दोन वर्षीय चिमुकल्यासह चौघे जखमी
आॅनलाईन लोकमत
नागपूर : भरधाव ट्रकचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे वनदेवीनगरातील एक हसता खेळता परिवार क्षणात उध्वस्त झाला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी हा अपघात घडला.
मेहबूब अली मुकदर अली (वय ४२) यशोधरानगरातील वनदेवीनगरात राहत होते. ते आॅटो चालवायचे. पै-पैका जोडून त्यांनी नुकताच नवीन अॅपे (एमएच ४०/ एसी ११०९) विकत घेतला. त्याचा आनंद परिवार साजरा करीत होता. नवीन अॅपेत बसून सर्वांनी कामठीला दर्शनाला जाण्याचा बेत आखला. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी २ वाजता मेहबूब अली, त्यांची पत्नी शकिला बानो (वय ३५), दोन वर्षीय मुलगा मासूम अली, मेव्हणी शकिला मोहम्मद ताहिर (वय ३०, रा. संगमनगर) आणि तिचा दोन वर्षीय मुलगा रज्जाक अंसारी हे सर्व अॅपेत बसून कामठीकडे निघाले. कळमना रिंग रोडवर
ओबेरॉय पॅलेस जवळ भरधाव वेगात आलेल्या ट्रक (एमएच ३१/ सीक्युू ५५३०)च्या चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून मेहबूब अलीच्या अॅपेला जोरदार धडक मारली. त्यामुळे अॅपेत बसलेल्या मेहबूब अली आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना जबर जखमा झाल्या. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मेहबूब यांना मृत घोषित केले. दोन वर्षीय चिमुकला मासूम गंभीर जखमी आहे. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. जमावाने धाव घेतल्याचे पाहून आरोपी चालक ट्रक तेथेच सोडून पळून गेला. शकिला यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर ठाण्यातील हवलदार अक्षय सोरदे यांनी आरोपी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा नोंदविला. त्याचा शोध घेतला जात आहे.
परिवार झाला निराधार
नवीन वाहन घेतल्याच्या आनंदाने मेहबूब अलीच्या परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यामुळे हसत गप्पा करीत ते कामठीकडे निघाले होते. मात्र, काही कळायच्या आतच काळाने मेहबूब यांच्यावर झडप घातली. आता कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे मेहबूबअलीचा परिवार झटक्यात उध्वस्त झाला आहे.