झाडांमध्ये रस्ता की रस्त्यात झाडे!
By Admin | Updated: June 20, 2016 02:35 IST2016-06-20T02:35:38+5:302016-06-20T02:35:38+5:30
मागील काही महिन्यांपासून रुंदीकरणाचे काम सुरू असलेला महाराजबागेतील मुख्य रस्ता हा उत्तर अंबाझरी मार्ग ...

झाडांमध्ये रस्ता की रस्त्यात झाडे!
नागपूर : मागील काही महिन्यांपासून रुंदीकरणाचे काम सुरू असलेला महाराजबागेतील मुख्य रस्ता हा उत्तर अंबाझरी मार्ग व अमरावती रोडला जोडणारा प्रमुख दुवा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या रस्त्यांवरून दिवसभर शेकडो वाहनांची वर्दळ असते. यात मागील वर्षभरापासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जात आहे. परंतु ते अत्यंत संथगतीने सुरू असल्याने त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय सध्या रस्त्यांत झाडे आहेत, की, झाडांत रस्ता आहे! असे चित्र दिसून येत आहे.
वास्तविक या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी येथील अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मात्र यानंतर अजूनही अनेक झाडे रस्त्याच्या मध्ये उभी आहेत.
शिवाय त्या झाडांच्या सोबतीला ठिकठिकाणी विजेचे खांबसुद्धा आहेत. हा रस्ता तयार करीत असलेल्या कंत्राटदाराने रस्त्यावरील सर्व झाडे आणि विजेच्या खांबाभोवती डांबरीकरण केले आहे. यामुळे ती सर्व झाडे आणि विजेचे खांब रस्त्याच्या मधोमध आले आहेत.
पावसाळ््यात समस्या वाढणार
नागपूर : महाराजबाग परिसरात रस्त्याच्या कामामुळे अनेक झाडांची मुळे उघडी पडली असून, ते वादळाच्या तडाख्यात रस्त्यावर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातून या रस्त्यावर फार मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, या रस्त्यावर महाराजबाग उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वारसुद्धा आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची थेट या रस्त्यावरच वाहने पार्क केली जातात. तसेच रस्त्याचे काम सुरू असल्याने तो ठिकठिकाणी खोदण्यात आला असून, जागोजागी दगड, रेती व मातीचे ढीग टाकण्यात आले आहे. यामुळे येथून वाहनचालकाला फार मोठी कसरत करीत मार्ग काढावा लागतो.
सध्या पावसाळा सुरू झाला असून, येथे पहिल्याच पावसात वाहतुकीची फार मोठी तारांबळ उडणार आहे. यात या रस्त्याचे काम फारच कासवगतीने सुरू आहे. त्याचाही वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी लोकांच्या सुविधेसाठी या रस्त्याच्या कामाला वेग देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)